मुंबई -सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर ईडीच्या वतीने सुनील गोस्वामी यांनी युक्तिवाद करताना असे म्हटले, की सचिन वाझे हे प्रभावी व्यक्ती आहेत. तसेच, या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद करण्यात आला आहे. मनी लॉंड्रिंगप्रकरणी आज जामीनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणाचा निकाल आता 18 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सचिन वाझे यांच्या वकिलांनी आज युक्तिवाद केला. (Suspended police officer Sachin Vaze) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणात वाझेंना अटक करण्यात आलेली नाही असे सांगत वाझे पुराव्यांशी छेडछाड किंवा प्रभावित करण्याचा प्रयत्न करणार नसल्याची हमी वकिलांनी न्यायालयाला दिली आहे. सचिन वाझे पुराव्यांशी छेडछाड करू शकतो अशी चिंता तपासयंत्रणेनं व्यक्त केली असून, त्यांच्या जामीनाला विरोध केला आहे.
लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा - बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. तर, दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचे सचिन वाझेंनी तपासादरम्यान सांगितले होते.