मुंबई- जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांबाबत १० मे रोजी केंद्र सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास, १० मे नंतर मुंबईमधील सहार व डोमेस्टिक ही दोन्ही विमानतळ बंद करू, असा इशारा भारतीय कामगार सेनेने दिला आहे. तसेच ८ मे रोजी सहार विमानतळ येथे शिवसेनाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कामगार सेनेचे सूर्यकांत महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
कर्मचाऱ्यांना जेट कंपनी हवी असून त्याची विमाने उडाली पाहिजे. तसेच ज्या कामगारांना पगार दिला नाही, त्या कामगारांना पगार देण्यात यावा, जेटच्या कर्मचाऱ्यांच्या २ प्रमुख मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. सध्या जेटचे पायलट कॅबिन क्रू, इंजिनिअर्स, ग्राउंड स्टाफ, या कामगारांना इतर कंपन्या अर्ध्या पगारात किंवा तुटपुंज्या पगारात नोकरीसाठी बोलवत आहे. मात्र, ही बाब या कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे केंद्र शासनाने जेट एअरवेजला आर्थिक मदत करण्यासाठी बँकांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही महाडिक यांनी यावेळी केली.