मुंबई -राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यास त्यादृष्टीने नियोजन करून ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. अन्न व औषध प्रशासन आयुक्तालय येथे आज (सोमवारी) ऑक्सिजन तयार करणारे उत्पादक, पुरवठादार आणि वाहतुकदार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे ऑक्सिजन पुरवठा करताना आवश्यक असणारी यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित राहा,वी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. शिंगणे यांनी यावेळी केले. या वेळी अन्न व औषध प्रशासन सचिव विजय सौरभ, आयुक्त अरुण उन्हाळे, आरोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, राज्यातील 11 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता पडते आहे. याचे प्रमाण सुमारे 500 मेट्रिक टन एवढे आहे तर सध्या एक हजारपेक्षा जास्त ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. तरीही काही ठिकाणी ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सर्व पुरवठादार आणि वाहतुकदार यांनी आपले वितरणाचे जाळे वाढवून योग्य सहकार्य करावे आणि गरजूंपर्यंत ऑक्सिजन पोहचेल याची खबरदारी घ्यावी. या कामात काही अडचण असल्यास शासनातर्फे अडचण दूर करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.