महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्थमंत्री मुनगंटीवारांनी काँग्रेसमधून भाजपत येणाऱ्यांना म्हटले बिभीषण

काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये येणारे नेते म्हणजे रामासोबत येणारे बिभीषण आहेत, अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले आहे.

By

Published : Mar 30, 2019, 9:10 PM IST

Updated : Mar 30, 2019, 9:47 PM IST

सुधीर मुनगंटीवार

मुंबई- काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये येणारे नेते म्हणजे रामासोबत येणारे बिभीषण आहेत, अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करणाऱ्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस नेत्यांना प्रवेश देत असल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.

काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश काही नवीन नाही. अगदी रामायण काळापासून हे सुरू आहे. भगवान रामासोबत सत्याची बाजू होती म्हणून बिभीषण रावणाची साथ सोडून आला. भगवान रामाने त्याला सोबत घेतले,'' असा तर्क मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेत्यांनीयुक्त होत चाललेल्या भाजपच्या बचावार्थ लावला. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यावर सुजय विखे पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, मदन भोसले, रणजितसिंह मोहिते-पाटील आदी काँग्रेस आघाडीतील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपही काँग्रेसयुक्त भाजप होत असल्याची टीका होत आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदीच हवेत

महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्रात नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे.

"केंद्रात २००९-१४ या काळात काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार असताना महाराष्ट्राला ९० हजार ४४१ कोटींची मदत करण्यात आली. मात्र, मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात ४५ महिन्यात काँग्रेसच्या तुलनेत जवळपास १ लाख ६० हजार ३९ कोटींची मदत करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करायचे असेल तर केवळ मोदींच्याच हाती देशाची सूत्रे हवीत, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली. ४२ खासदार निवडून दिले तर राज्याचा एवढा विकास झाला, ४८ खासदार निवडून दिले तर किती विकास होईल, याची कल्पना करा, असेही ते म्हणाले.

काँग्रेसने केवळ स्मारक बांधण्याच्या घोषणा केल्या

छत्रपती शिवरायांचे स्मारक असो की, बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक असो, या सर्व प्रकल्पांना मार्गी लावण्याचे कामही मोदी सरकारनेच केले. काँग्रेसने केवळ स्मारक बांधण्याच्या घोषणा केल्या, अशी टीकाही त्यांनी केली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतून शेतकऱयांचे आजवर २१ हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात आले असल्याचा दावाही त्यांनी केला. महात्मा गांधींनी सुचवलेल्या प्रमाणे काँग्रेसचे नेते आता काँग्रेस विसर्जित करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Last Updated : Mar 30, 2019, 9:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details