मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास मागील दीड महिन्यांपासून सीबीआयकडून सुरू आहे. यात आता एम्स रुग्णालयाच्या तज्ञांकडून तयार करण्यात आलेल्या सुशांतच्या विसरा फॉरेन्सिक रिपोर्टची पडताळणी सीबीआयचे पथक करणार असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय सुशांतच्या कुटुंबियांची पुन्हा चौकशी होणार असल्याचे समजते.
सुशांतच्या कुटुंबीयांची सीबीआय करणार पुन्हा चौकशी; एम्सच्या रिपोर्टचीही होणार पडताळणी
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा सुशांतच्या कुटुंबियांची सीबीआयकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तब्बल 35 हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले असून यामध्ये रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पीठानी, दिपेश सावंतसह सुशांतच्या परिचयातल्या अन्य व्यक्तींची चौकशी करण्यात आलेली आहे. सुशांतच्या कुटुंबामधील त्याचे वडील के. के. सिंह, त्याची बहीण मितु सिंह, प्रियंका सिंह व मेव्हणे यांची सुद्धा सीबीआयकडून चौकशी करण्यात आलेली होती. मात्र आता सुशांतसिंहच्या कुटुंबीयांची पुन्हा एकदा चौकशी होणार असल्याचेही सीबीआयच्या सूत्रांकडून कळत आहे.
सुशांतने 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे स्थित घरी आत्महत्या केल्यानंतर या संदर्भात बराच वाद विवाद निर्माण झाला होता. सोशल माध्यमांवर सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, म्हणून मागणी केली जात होती. याच दरम्यान बिहार पोलिसांकडे सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सीबीआयकडून गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. तब्बल दीड महिना चौकशी केल्यानंतरही सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण सीबीआय पथकाला मिळालेले नाही. एम्सच्या अहवालानुसार सुशांतचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाला असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, सुशांतच्या कुटुंबीयांकडून सुशांतच्या काही बँक खात्यातून जवळपास 15 कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता. या संदर्भात या अगोदरच मुंबई पोलिसांकडून या बँक खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आल होते. या रिपोर्टमध्ये कुठलेही आर्थिक झाली नसल्याचे आढळून आले. मात्र सुशांतच्या कुटुंबीयांकडून सतत होणाऱ्या आरोपानंतर यासंदर्भात सीबीआयने सुद्धा तपास केला होता. सुशांतच्या चार बँक खात्यांच्या नॉमिनीवर त्याच्या बहिणीचे नाव असल्यासही समोर आलेले आहे. त्यामुळे सुशांत व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये काही ताण तणाव होता का? याचीही चाचपणी आता सीबीआयचे पथक करणार असल्याचे समोर येत आहे.