मुंबई- महानगरपालिकेच्या कुर्ला भाभा रुग्णालयात लहान मुलांसाठी असलेल्या वॉर्डमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कक्षात रुग्ण असलेल्या लहान मुलांसाठी खेळणी ठेवली जाणार आहेत. यामुळे लहान मुलांना रुग्णालयात घरासारखे वातावरण मिळेल आणि ती आजारपणातून लवकर बरी होतील, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाला आहे.
पालिका रुग्णालयात लहान मुलांना खेळण्यासाठी विशेष कक्षाची सोय मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मुंबई बरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यातून उपचार घेण्यासाठी रुग्ण येतात. त्यात लहान मुलांचाही समावेश असतो. रुग्णालयात उपचारासाठी अनेक दिवस राहावे लागत असल्याने त्या कालावधीत लहान मुले कंटाळतात. यामुळे लहान मुलांना घरच्यासारखे वातावरण मिळावे, या उद्देशाने कुर्ला येथील भाभा रुग्णालयात पालिकेने विशेष कक्ष स्थापन करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केली. त्यांच्या मागणीनुसार रुग्णालयात विशेष कक्ष बनवण्यात आला आहे. त्यात लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी ठेवण्यात आली. खेळण्यासाठी असलेल्या या विशेष कक्षाला लहान मुले आणि त्यांच्या पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कुर्ला भाभा या रुग्णालयाप्रमाणेच पालिकेच्या सर्वच रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डमध्ये खेळण्यासाठी कक्ष बनवण्यात यावा, अशी मागणी डॉ. सईदा खान यांनी केली होती. या कक्षामध्ये कॅरम, चेंडू, डोलणारे प्राणी, गाड्या, सायकल आदी विविध प्रकारची खेळणी उपलब्ध करण्यात यावीत तसेच खेळण्याबरोबरच बालवाडी व पहिलीच्या मुलांकरीता इंग्रजी व मराठी बाराखडी, आकडेवारी, पक्षी, प्राणी, फळे व फुलांचे चित्रही उपलब्ध करून त्याचे मोठमोठे स्टिकर भिंतीवर लावण्यात यावेत, अशा सूचना डॉ. खान यांनी केल्या आहेत. या मागणीला पालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे आता भाभा रुग्णालयाच्या धर्तीवर पालिकेच्या सर्वच रुग्णालयात लहान मुलांना खेळण्यासाठी कक्ष स्थापन केला जाणार आहे.
विशेष कक्षाचा फायदा -
कुर्ला भाभा रुग्णालयात स्थानिक नगरसेविका सईदा खान यांच्या प्रयत्नाने लहान मुलांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला. रुग्णालयात आल्यावर आम्ही मुलांना इंजेक्शन आणि औषधे देत होतो. तेव्हा मुले नुसती झोपून असायची. विशेष कक्षामुळे लहान मुलांना घरासारखे वातावरण मिळायला लागल्याने ती मुले आनंदी राहून उपचाराला साथ देतात. यामुळे मुलांमध्ये लवकर सुधारणा होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती पोयरेकर व अधिसेविका प्राजक्ता वरळीकर यांनी सांगितले.