महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊननंतर परप्रांतीय मजुरांसाठी विशेष गाड्या सोडाव्यात - उपमुख्यमंत्री

लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरू झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतील. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मुंबई आणि पुणे येथून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात. त्यासाठीचे नियोजन आधीच करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Apr 23, 2020, 2:45 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनची मुदत 3 मे ला संपत आहे. लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरू झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतील. त्यामुळे गर्दी उसळून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मुंबई आणि पुणे येथून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात. त्यासाठीचे नियोजन आधीच करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिले असून परप्रांतीय मजुरांच्या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे. पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन केल्यापासून उत्तरप्रदेश, बिहारसह देशाच्या विविध राज्यातील मजूरबांधव महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. राज्य शासनातर्फे त्यांच्यासाठी शिबीरव्यवस्था केली असून त्यांना निवास, भोजन, आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहे. राज्यशासनाच्या शिबिरांमध्ये आजमितीस साडेसहा लाख मजूर राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारेही तितक्याच मजूरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

टाळेबंदीमुळे राज्यातील उद्योग, बांधकाम आणि इतर सेवाक्षेत्र बंद असल्यामुळे या मजूरांच्या हाताला काम नाही. दीड महिन्यांपासून शिबिरात राहिल्यामुळे ही मंडळी आपापल्या घरी जाण्यास अधीर आहेत. पहिल्या देशव्यापी टाळेबंदी समाप्तीच्या दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरात उसळलेली गर्दी त्याच अधिरतेचे उदाहरण आहे. रेल्वे मंत्रालयाने सदर वस्तुस्थितीचा विचार करुन केंद्र सरकारतर्फे लागू लॉकडाऊनची मुदत 3 मे रोजी किंवा केंद्राने ठरवल्याप्रमाणे संपल्यानंतर, ज्यावेळी रेल्वेसेवा सुरू होतील तेव्हा महाराष्ट्रातील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मुंबई व पुणे येथून विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात. त्यामुळे या मजूरांना सुरक्षित घरी जाता येईल तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोकाही टाळता येईल.

महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य असल्याने, तसेच येथील बांधकाम व्यवसाय मोठा असल्याने उत्तरप्रदेश, बिहारसह इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय मजूरांची संख्या देशात सर्वाधिक आहे. हे मजूर असंघटीत क्षेत्रात रोजंदारीवर काम करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details