मुंबई- 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरताना अत्यंत चुकीची माहिती दिली आहे. ज्या वकिलाकडून शपथपत्र तयार करण्यात आले ते वकील जिवंत नाहीत. शिवाय, ही नोटरी २०१८ पर्यंत मुदत असलेली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामनिर्देशन अर्ज निवडणूक आयोगाने तात्काळ रद्द करावा,' अशी मागणी काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी आज मुंबईत केली. यासाठी आपण आज निवडणूक आयोगाला भेटून या विषयाचे सर्व कागदपत्रे देणार असल्याचे त्यांनी मुंबईत सांगितले.
हेही वाचा-भुसावळ्यात सामूहिक हत्याकांडानंतर तणावपूर्ण शांतता; घटनास्थळी जमावबंदी लागू
देशमुख म्हणाले, की 'दक्षिण पश्चिम नागपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक लढवत आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द व्हावा,' अशी मी मागणी करत आहे. 'मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली नोटरी २०१८ पर्यंत मर्यादीत होती. त्यात ज्यांच्याकडून ती करण्यात आली ते पुरुषोत्तम मोरेश्वर सोनटक्के हे वकील जिवंत नाहीत. त्यांचे निधन अगोदर झालेले आहे. मुख्यमंत्र्यांना ही बाब लक्षात आल्याने निवडणूक अधिकार्यांवर दबाव आणून पुरुषोत्तम नरेंद्र सोनटक्के आणि विवेक सोनटक्के असे दुसऱ्या नावाने नोटरी केली. यामुळे खोटी माहिती दिली म्हणून अॅड. उके यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे फडणवीस यांचा नामनिर्देश तात्काळ रद्द झाले पाहिजे,' अशी आपली मागणी आहे. 'मुख्यमंत्री हे रिटर्निंग अधिकाऱ्यांवर दबाव आणात आहेत. आम्ही राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे जात आहोत. वारंवार मुख्यमंत्री यांच्या गोष्टी का होतात, यामागे असलेले राज काय आहे?,' असा सवालही देशमुख यांनी केला.
हेही वाचा-पुणे जिल्ह्यात 'बंडोबा' होणार का 'थंडोबा'..?
'मुख्यमंत्र्यांनी नोटरी केली त्याची मुदत ही संपली होती. जे कागदे दिले ते दुसऱ्या दिवशी देण्यात आले. त्याची चौकशी व्हावी. इतर सर्वसामान्य लोकांचे अर्ज थोडी चुक असली तरी ते रद्द केले जातात. मग यांचे का नाही?' असा सवाल ही देशमुख यांनी केला. 'यासाठी क्रिमिनल तपास व्हावा. विदर्भात जे अर्ज बाद झाले त्यात बुद्धिस्ट का आहेत ? हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे होत असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी.' अशी मागणी देशमुख यांनी केली.