मुंबई - दुरुस्तीच्या नावाखाली गोरेगावमधील पालिकेचे एकमेव असलेले सिद्धार्थ रुग्णालय स्थलांतर करून बंद करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, या स्थलांतराला गोरेगावच्या नागरिक आणि राजकीय नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्णालय बंद करण्याचा पालिका प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
दुरुस्तीच्या नावाखाली गोरेगावातील सिद्धार्थ रुग्णालय बंद करण्याचा घाट; मनसेचा विरोध गोरेगाव, ओशिवरा परिसरातील दररोज हजार ते दीड हजार रुग्ण येथील सिद्धार्थ रुग्णालयातील ओपीडीत उपचार घेतात. डायलिसीस, सिटीस्कॅन विभागात सतत रुग्ण येत असतात. सध्या या रुग्णालयच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे रुग्णालयातील विभाग इतर पालिकेच्या रुग्णालयात स्थलांतर करण्यात येणार आहेत, असा सूचना दर्शक फलक रुग्णालयात लावण्यात आला आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणारे नागरिक धास्तावले आहेत.
काही दिवसात पावसाळा सुरू होईल. त्यावेळी डोकेवर काढणाऱ्या साथीच्या आजारांवरील उपचारासाठीही रुग्णांना जोगेश्वरीच्या ट्रामा केअर, कांदिवलीच्या शताब्दी व बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात ये जा करावी लागणार आहे. मात्र, एखाद्या रुग्णाची अवस्था बिकट असल्यास ये-जा करण्यातच त्वरीत उपचाराअभावी त्याचा जीव जाण्याचा धोका अधिक आहे. याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी विरोध केला आहे. ऐन पावसाळा सुरू होण्याच्या काळात रुग्णालय बंद करण्याचा डाव केल्यास तो मनसे हाणून पाडेल असा इशारा जाधव यांनी दिला आहे.
रुग्णालयातील विभाग शताब्दी, ट्रामा व भगवती रुग्णालयात स्थलांतर करण्यात येतील. रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती हाती घेण्यात येणार असल्यामुळे रुग्णालय बंद करण्यात येणार असल्याचे रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पाटील यांनी सांगितले.