मुंबई- देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अद्याप युतीचा तिढा सुटला नाही. यामुळे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून जागावाटपाबाबत चर्चा केली. मात्र, उद्धव यांनी राज्यात मोठ्या भावाचा आग्रह कायम ठेवत १९९५च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव पुढे केला आहे. विधानसभेच्या १६९ जागांसाठी शिवसेना अडून बसली आहे.
शिवसेनेचे दबावतंत्र, शिवसेनेला 1995 च्या सूत्रानुसार हव्यात विधानसभेच्या 169 जागा
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या वाटेला आलेल्या अपयशामुळे भाजपने मित्रपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या वाटेला आलेल्या अपयशामुळे भाजपने मित्रपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत युतीसाठी मध्यस्थी केली होती. त्यातच सोमवारी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी उद्धव यांना फोन करून जागावाटपाची चर्चा केली. शहा यांचा केवळ लोकसभेपुरता जागावाटपाचा आग्रह आहे. मात्र, लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही जागावाटप व्हावे, अशी भूमिका उद्धव यांनी घेतली आहे. त्यासाठी उद्धव यांनी १९९५ चे जागावाटप सूत्र मांडले. त्यावेळी शिवसेनेने १६८ तर भाजपने ११६ जागा लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत शिवसेना-भाजप या पक्षांनी १३८ जागा जिंकून युतीचे पहिले सरकार राज्यात स्थापन केले होते. जागावाटपाच्या या सूत्रानुसार राज्यात युतीचे सरकार आले तर मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचाच दावा असणार आहे.
युतीसाठी लोकसभेचे जागावाटप कसे असेल, हे अद्याप निश्चित नाही. मात्र, राज्याच्या विधानसभेत भाजपचे संख्याबळ १२२ असताना ९५च्या जागावाटप सूत्रानुसार हा पक्ष ११६ जागा लढवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच आपणच मोठे भाऊ आहोत, या भूमिकेपासून आपण हटणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्यामुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे.