मुंबई - राज्यातील सत्ता स्थापनेचा विषय अधिक रंजक होताना दिसून येत आहे. भाजपने तटस्थ भूमिका घेतल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुठल्याही पाठींब्याविना शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करू शकते. राष्ट्रवादी पक्षप्रमुख शरद पवार यांनी, कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास तो काँग्रेस-राष्ट्रवादी या देन्ही पक्षांमध्ये सविस्तर चर्चा करून घेतला जाईल, असे सूचक वक्तव्य केले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने, आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सांगितले आहे. राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली असून, आजचा दिवस शिवसेनेसाठी कसोटीचा ठरणार आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा शिवसेनेकडे नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ किंवा भाजपची तटस्थ भूमिका असे दोन मार्ग आहेत.