मुंबई - हाथरस बलात्कार प्रकरणात यूपी सरकार आणि पोलिसांबद्दल देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. मात्र, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांची आणि महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांच्या सध्या हाथरस प्रकरणावर कोणत्याच प्रतिक्रिया दिसून येत नाहीत. ते सध्या शेपूट घालून बसलेत आहेत काय ? असा सवाल शिवसेनेने केला आहे. तसेच मुंबई पोलिसांना बाबर सेना म्हणणारी अभिनेत्री कंगना रणौत हाथरस प्रकरणावर कोणतेही वक्तव्य करताना दिसून येत नाही. त्यावरून हाथरसचे बलात्कारी त्या नटीबाईचे भाईबंद आहेत का, असे म्हणत कंगनावरही नाव न घेता निशाणा साधला आहे.
सुशांतच्या प्रकरणात अनेक राजकारण्यांनी महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तसेच सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? असा सवाल शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.