मुंबई :राज्यातल्या सत्तांतरानंतर शिवसेनेतील फूटीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तर धनुष्यबाण या चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आज यावर उद्धव ठाकरे गटाकडून व शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत जोरदार युक्तीवाद करण्यात आला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी पक्ष चिन्ह्यावर दावेदारी सिद्ध करण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकून घेत 30 जानेवारीला पुढील सुनावणी घेणार असल्याचे सांगितले. तसेच दोन्ही गटांना सोमवारी 23 जानेवारीपर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपणार : शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाने पक्षावर हक्क सांगितला असून पक्षचिन्हाची लढाई निवडणूक आयोग ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात आहे. याप्रकणी आधी झालेल्या सुनावणीत खरी शिवसेना कोणाची, याचा निवाडा केंद्रीय निवडणूक आयोग करेल, असे सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने म्हटले होते. त्यानुसार शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर आज सुनावणी पार पडली आहे.पुढील सुनावणी 30 जानेवारी रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे.
प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना : निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला त्यांच्याजवळ असलेले पदाधिकारी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेप्रमाणे दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. मात्र ठाकरे गटाकडून ठाण्याचे विजय चौगुले, रायगडचे राजाभाई केणी, नंदुरबारचे श्रीराम रघुवंशी, नंदुरबारचे किरनसिंह वसावे, चंद्रपूरचे नितीन माटे, धाराशिवचे दत्तात्रय साळुंखे, धाराशिवचे सुरज साळुंखे यांच्या कागदपत्रांवर निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत आक्षेप घेण्यात आला होता . त्यामुळे आजच्या सुनावणीवर आधी आक्षेप घेण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिंदे गटाकडून खोटी कागदपत्रे सादर :ठाकरे गटाकडून कागदपत्रे कोर्टात सादर केली होती. त्यावर ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या याचिकेत अनेक त्रुटी आहेत, असे म्हटले होते. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची कागदपत्रे योग्य असतील तर त्यासाठी ओळखपरेड करण्यात यावी आम्हीही ओळखपरेडसाठी तयार आहोत असा मुद्दा सिब्बल यांनी मांडला होता. आज शिंदे यांच्यासोबत जे आमदार आहेत ते सारे शिवसेनेच्याच चिन्हावर निवडून गेलेले आहेत. पक्षाच्या धोरणांनुसारच मतदार उमेदवारांना मते देतात, असेही सिब्बल यांनी नमूद केले होते.