मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला आज ५७ वर्षे पूर्ण झाली आहेत. इतिहासात पहिल्यांदाच या वर्धापन दिनानिमित्त दोन वेगवेगळे कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आले आहेत. एक कार्यक्रम (उबाठा) ठाकरे गटाच्या पक्षाचा आणि दुसरा (बाळासाहेबांची शिवसेना) मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचा असे दोन वर्धापन दिन साजरे होणार आहेत. आज वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे पुन्हा ठाकरे गटाला धक्का देणार असल्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ठाकरे गटातील माजी आमदार आणि मुंबईचे माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे गटाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पारंपारिक वर्धापन दिन हा मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी ६:३० वाजता पार पडणार असून या वर्धापन दिन सोहळ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. यासाठी राज्यभरातून पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिन सोहळ्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा बरोबर सध्याचा फेमस ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मनोरंजनात्मक कार्यक्रम याप्रसंगी सादर होणार आहे. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात शिंदे गटाचा कशाप्रकारे समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाळासाहेब ठाकरे गट व उद्धव ठाकरे गटानेही शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
शिंदे गटाचा वर्धापन दिन नेस्को मैदानात:दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन साजरा केला जाणार असल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेत फार मोठी उत्सुकता आहे. सायंकाळी ७ वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. सुरुवातीला दीड तास आताच्या सत्य परिस्थितीवर नाट्यांतर असणार आहे. त्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रत्येक आमदारावर साधारण ३०० कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रात्री साधारण ९ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे भाषण होणार आहे.
दोन्ही कार्यक्रमावर भाजप नेत्यांचे बारकाईने लक्ष:आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या दोन्ही कार्यक्रमावर भाजपच्या नेत्यांचे बारकाईने लक्ष असणार आहे. विशेष करून शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने स्थापन झालेल्या बाळासाहेबांची शिवसेनेला भाजपने खरी हिंदुत्ववादी शिवसेना म्हटले आहे. त्यांच्याबरोबच भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही बनावट असल्याचा शिंदे गटाकडून दावा करण्यात येतो. ठाकरे गट पूर्णपणे संपवण्यासाठी भाजपबरोबर शिंदे गटही प्रयत्नशील आहे. याच कारणाने आज होणाऱ्या दोन्ही कार्यक्रमावर भाजप नेते बारकाईने लक्ष ठेवून असणार आहेत.
हेही वाचा-
- Shivsena Anniversary: आज 57 वर्षाची झाली शिवसेना, जाणून घ्या जडण घडणीचा इतिहास
- Manisha Kayande criticizes Uddhav Thackeray: मनीषा कायंदे यांचा शिंदे गटात प्रवेश, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाली सर्वात मोठी जबाबदारी