मुंबई:बहुचर्चित शीना बोरा खून प्रकरणात शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान एका साक्षीदाराची साक्ष नोंदवली गेली. मात्र न्यायालयाकडून उलट तपासणी झाली त्यावेळेला जबाबदार तपास अधिकाऱ्यांचीच साक्षीच्या ठिकाणी सही नसल्याचे उघड झाले. देवेश कुमार या साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली. दरम्यान याप्रकरणात न्यायालयाने पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.
सुनावणीवेळी हजर नव्हते साक्षीदार: शीना बोरा खून प्रकरणाची देशभरात चर्चा झाली होती. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा चालक श्यामवर राय हा माफीचा साक्षीदार झाला आहे. उच्च न्यायालयाने श्यामवर रायला जामीन दिला आहे. तसेच इंद्राणी मुखर्जी देखली सध्या जामीनावर बाहेर आहेत. दरम्यान शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणीवेळी मात्र सर्व साक्षीदार हजर नव्हते. फक्त देवेश कुमार नावाचा एक साक्षीदार यावेळी हजर होता. या साक्षीदाराची नोंद करण्यात आली आहे, परंतु न्यायालयाने जेव्हा साक्षीदारांची नोंद असलेली डायरी तपासली, तेव्हा वेगळीच बाब समोर आली. साक्षीदारांची नोंद असलेल्या डायरीत तपास अधिकारांचीच सही गायब असल्याचे आढळून आले. ही बाब न्यायालयासमोर उघड होताच न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.
न्यायालयाची तंबी: शीना बोरा खून खटल्यामध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त केले आहेत. त्यातून जो काही डेटा मिळाला आहे, त्यातून 42 पानी अहवाल तयार केला गेला. त्यावर साक्षीदारांचे जबाबदेखील नोंदवले होते. त्या संपूर्ण कागदपत्रांवर सह्या केल्याचे साक्षीदार देवेश कुमारनेही सांगितले. मात्र साक्षीदारांची उलट तपासणी न्यायालयासमोर झाली, तेव्हा साक्ष दिलेल्या डायरीमध्ये अधिकाऱ्यांचीच सही नसल्याची बाब न्यायालयाच्या समोर आली. हा प्रकार गंभीर आहे, हे खपवून घेतले जाणार नसल्याची तंबी न्यायालयाने तपास अधिकाऱयांना दिली.