मुंबई- पारंपरिक बारामती लोकसभेची जागा आम्हीच जिंकू, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच लोकसभेत महाआघाडीचे सरकार स्थापन करू, असेही त्यांनी म्हटले.
देशातील अनेक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते. तरीही निकालानंतर एकत्र येत युपीएचे सरकार स्थापन करण्यात आले. निकाल लागल्यानंतर काही दिवसात याबाबत सहमती होईल, असा आशावाद पवार यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी देशात महाआघाडी करण्याची पूर्ण तयारी झाली. मात्र, ऐन निवडणूकीच्या तोंडावर उत्तरप्रदेशात समाजवादी आणि बहुजन पक्षाने वेगळी चूल मांडली. तर बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनीही स्वबळावर जाणे पसंत केले. यावर विचारणा केल्यानंतर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
देशात विरोधीपक्ष मिळून एक चांगला पर्याय देऊ शकते. यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पण विरोधकांकडे ही सरकार चालवायची शक्ती आहे. २००४ मध्ये युपीएच्या सरकारने याचे उदाहरण दिले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात १० वर्ष आघाडीच्या सरकारने देशाची धुरा वाहिली आहे. आता देशभरात काही धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र लढत नसल्या तरी आम्ही मिळून बहुमत सिद्ध करू शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.