मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज 2 मे रोजी त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेबरोबरच तेथे उपस्थित पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यांनी पवारांना त्यांचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्यांच्या या घोषणेनंतर उद्धव गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांचे ट्विट : संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, 'एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही गलिच्छ राजकारण आणि आरोप - प्रत्यारोपांना कंटाळून शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी पण तेच केले आहे. बाळासाहेबांना शिवसैनिकांच्या प्रेमामुळे आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. बाळासाहेबांप्रमाणेच पवार साहेबही राज्याच्या राजकारणाचा आत्मा आहेत'.
संजय राऊत यांनी आधीच संकेत दिला होता : संजय राऊत यांनी निवडणुकीच्या वर्षभर आधी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडीचे संकेत दिले होते. ते म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षामुळे पक्षात फूट पडू शकते. राऊत यांनी यापूर्वी दावा केला होता की, पवारांनी त्यांना सांगितले की पद सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे. यावरून शरद पवार यांचे पुतणे अजित पवार राष्ट्रवादीपासून फारकत घेऊन भाजपला पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. या अटकळांना पक्षाने पूर्णविराम दिला असतानाच आता शरद पवार यांनी मंगळवारी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला.
सुप्रिया सुळेंचा 'दोन राजकीय धमाके'चा इशारा : शरद पवार यांच्या राजीनाम्याची घोषणा अनपेक्षित असली तरी राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी याची पूर्वकल्पना दिली होती. गेल्या महिन्यात अजित पवार भाजपला पाठिंबा देत असल्याच्या शक्यतां दरम्यान सुप्रिया सुळे यांनी संकेत दिले होते की, लवकरच दोन राजकीय स्फोट होतील - एक दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात. शरद पवार यांनी जरी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी ते राजकारणातून निवृत्त होणार नाहीत. ते म्हणाले की, ते पक्षासोबत असतील पण पक्षाचे प्रमुख म्हणून राहणार नाहीत. आता शरद पवारांच्या पायउतारामुळे अजित पवारांना भाजपला पाठिंबा देणे सोपे होऊ शकते.
हे ही वाचा :Sharad Pawar Retirement : शरद पवारांचा अध्यक्षपदावरुन निवृत्तीचा निर्णय; जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड ढसाढसा रडले