मुंबईSanjay Raut on Jagdip Dhankad :उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना महात्मा गांधी महापुरुष होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी युगपुरुष असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं देशासह राज्यात राजकारण तापलं आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
धनखड यांच्यावर टीका :उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, महात्मा गांधी हे महापुरुष होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरुष आहेत. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी धनखड यांच्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 2024 नंतर यांना महापुरुष कोण? युगपुरुष कोण? कळणार असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी काल मुंबईत जैन विचारवंत तसंच तत्त्वज्ञ श्रीमद राजचंद्र यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शतकातील युगपुरुष असं संबोधलं होतं. तसंच महात्मा गांधींना मागच्या शतकातील महापुरुष असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
समाजामध्ये विष पेरण्याचं काम :या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, महात्मा गांधींची तुलना कोणासोबतच होऊ शकत नाही. आपण त्यांना बापू म्हणतो, राष्ट्रपिता म्हणतो. राष्ट्रपिता ही उपाधी महात्मा गांधींना जनतेनं दिली आहे. ती महात्मा गांधी यांनी स्वतःहून लावून घेतलेली नाही. राष्ट्रपिता या देशात दुसरे कोणी होऊ शकत नाही. गांधीच एकमेव राष्ट्रपिता राहतील. कुणाला कुणाची हुजरेगिरी, लाचारी करण्याची सवय असते. विष पेरण्याचं काम करणाऱ्यांना महात्मा उपाधी कधीच मिळणार नाही, असा मला विश्वास असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.