ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मुंबई Sanjay Raut On Narendra Modi :भारत विश्वचषक फायनल का हरला? यावर आता राजकारण सुरू झालंय. त्यातच सोशल मीडियावर 'पनौती' हा हॅशटॅग ट्रेंड होत असल्याचं बघायला मिळतंय. रविवारी (19 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी देखील आले होते. त्यामुळं विरोधकांकडून आता थेट मोदींना लक्ष्य केलं जातंय. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून, 'हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नसून भाजपा विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता' अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत : मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, भारतीय संघ हरला याचं दुःख सर्वांना झालय. या देशांमध्ये खिलाडू वृत्ती आहे आणि खेळांमध्ये हार-जित होत असते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताचा पराभव झालाय. पण, आपण पाहिलं असेल अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबई वानखेडे मैदानात होतात. मात्र, या वेळेला क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी घुसली आहे. त्यांनी वल्लभाई पटेल स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवलं. सामना या ठिकाणी ठेवला कारण, आपण जिंकलो असतो तर सर्व श्रेय आपल्याकडं घेण्याचा भारतीय जनता पक्षाचा विचार होता. आता हरलात ना? मग त्याचंही श्रेय घ्या.
हा सामना भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नाही तर भाजपा विरुद्ध ऑस्ट्रेलिया :पुढे बोलताना राऊत म्हणाले की, हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नसून, भाजपा विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता. भारतीय संघ उत्तम खेळला. हरले असले तरी त्यांचे अभिनंदन करायला हवं. त्यांच्या दुःखात आपण देखील सामील झालं पाहिजे. मी संघावर व्यक्तिगत टीका करत नाही. वर्ल्ड कप जिंकला असता तर देशाला आनंद झाला असता. तसंच नियोजनपूर्वक पद्धतीनं राजकारण करण्यासाठी निकालानंतरची व्यवस्था करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाच्या दुर्दैवानं त्यावर पाणी फिरलं, असंही ते म्हणाले.
...तर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं :दरम्यान, सर्वप्रथम कपिल देव यांनी देशाला विश्वचषक मिळून दिला. मात्र, त्यांच्या संघाला आमंत्रित केलं गेलं नाही. कपिल देव यांचं तिथं आगमन झालं असतं, तर इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं. याला म्हणतात राजकारण. पडद्यामागचं राजकारण रविवारी झालं, भविष्यात त्यावर नक्कीच चर्चा होणार. क्रिकेटची पंढरी मुंबई. मुंबईतून सर्वच उद्योग घेऊन जायचे, पैसा घेऊन जायचा, कॉर्पोरेट कंपन्या घेऊन जायचं आणि क्रिकेट देखील घेऊन जायचं. इतकच नाही तर हळू-हळू मुंबईचं महत्व कमी करायचं हा यांचा प्लॅन आहे, असा आरोपही यावेळी राऊतांनी केलाय.
हेही वाचा -
- भारताच्या पराभवानंतर संतप्त क्रिकेटप्रेमींनी फोडला टीव्ही; अलिगडमधील घटना
- Amitabh Bacchan News: भारताच्या पराभवानंतर बिग बी ट्रोल होण्याचं कारण काय? चाहते म्हणाले, तुमच्यामुळं भारतानं गमाविला विश्वचषक !
- लोक विसरतात; विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी न बोलावल्यामुळं कपिल देव नाराज