महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सामना अग्रलेख - राज्यात अस्थिरता नको, विरोधी पक्षाने आत्मनिर्भर व्हावे

भाजपात सध्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचीही अस्वस्थ तळमळ सुरू आहे. त्यातून राजकीय भूकंप होऊ नये, यासाठी भाजपला सावध राहण्याचा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

By

Published : May 16, 2020, 9:45 AM IST

मुंबई- पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर अभियानातील आत्मनिर्भर शब्दाचा वापर करून सामनातून राज्यातील विरोधी पक्षाला टोला लगावण्यात आला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्वतःच्या पायावर मजबुतीने आत्मनिर्भर झाले आहे. विरोधी पक्षाने देखील आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारल्यास राज्यात कोरोनाविरोधातील लढाईस बळ मिळेल, असे म्हणत चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांना टोला लगावण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभा अथवा विधानपरिषदेचा सभासद होणे गरजेचे होते. राज्यात कोरोनाचे संकट गडद होत होते आणि विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांच्या सभासद नसण्यावरून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, विरोधकांनी प्रयत्न करूनही उद्धव ठाकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे विरोधकांचे अघोरी प्रयोग त्यांच्यावरच उलटले, असा टोला भाजपला लगावण्यात आला आहे.

विधान परिषद निवडणुका पार पडल्यानंतरदेखील काँग्रेस पक्षात भूकंप होऊन राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल, असा दावा भाजपचे चंद्रकांत पाटील करत आहे. पाटलांना हे प्रयत्न करण्याचा राजकीय हक्क आहे, त्यामुळे त्यांनी खुशाल प्रयोग करावे. मात्र, पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकार बनविण्याचा प्रयोग कसा फसला, याची आठवण सामनातून पाटलांना करून दिली. राज्यात कोरोनाचे संकट असून सरकारने मदत आणि पूनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. राज्यातील स्थिती स्थिरावली की पाटलांनी सरकार पाडण्यासाठी कामाला लागावे, असेदेखील सांगण्यात आले आहे.

विरोधक हे सरकार जेवढे खिळखिळे करण्याचा प्रयत्न करेल, तेवढेच ते मजबूत आणि गतिमान होत जाईल, अशी खात्री सामनातून देण्यात आली. तर पाटलांनी फडणवीसांना सज्जन संबोधण्यावरूनही सामनातून टीका केली आहे. फडणवीसांच्या सज्जनतेचे पुरावे पाटील का देत आहेत, असा सवाल उपस्थित केला. तसेच पाटील आणि फडणवीस दोघेही सज्जन आहेत. मात्र, सध्याचे राजकारण गटारी झाल्याने सज्जनांचे मुखवटे गळून पडत असतात.

१०५ जागा असूनही सत्ता राखता न आल्याने भाजपऐवजी कोणीही असते तर हीच अवस्था झाली असती. भाजपात सध्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचीही अस्वस्थ तळमळ सुरू आहे. त्यातून राजकीय भूकंप होऊ नये, यासाठी भाजपला सावध राहण्याचा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details