मुंबईRiot Case : बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतिदिनाच्या (Balasaheb Thackeray Memorial Day) पूर्वसंध्येला मुंबईतील शिवाजी पार्क येथे अतिशय लाजिरवाणा प्रकार घडला. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून आल्याने राडा झाला होता. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात 50 ते 60 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरकुटे यांनी दिली आहे.
प्रकरणात पोलिसच तक्रारदार:शिवाजी पार्कवरील राडा प्रकरणात तक्रारदार पोलीसच आहे. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तसेच पोलिसांनी केलेले चित्रीकरण पाहून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे.
दोन्ही गटांची एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी:बाळासाहेब ठाकरे यांच्या 11 व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर स्मृतिस्थळाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि इतर पदाधिकारी आले होते. शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर आल्यानंतर घोषणाबाजी झाली. याचं रूपांतर दोन गटात झालेल्या राड्यामध्ये झालं. नंतर पोलिसांनी राड्यावर नियंत्रण मिळवलं. या घटनेचं चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झालं असून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनीसुद्धा चित्रीकरण केलं होतं. त्याच आधारावर शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.