मुंबई -दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र, काही कामगार संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यापैकी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारमध्ये समावेश करावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या कामगारांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित एस.टी.महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल पत्रात
‘कोरोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच, एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक आगारांमधील काम ठप्प आहे. ज्या आगारांमध्ये काम सुरू आहे, तिथेही असंतोष खदखदत आहेच. अशा स्थितीत, ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती कारवाई करण्यात येईल अशा नोटीसा एसटी महामंडळाने बजावल्या आहेत. दबावतंत्राचा वापर करुन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करुन घेण्यात येत आहे’.
‘एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टीमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे. आज गरज आहे ती एसटी कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची. एसटी कर्मचारी, कामगार जगला तरच एसटी जगेल, हे भान बाळगण्याची. माझी आपणाला आग्रहाची विनंती आहे की, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी-कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल’. माझ्या या मागणीचा आपण गांभीर्यपूर्वक विचार कराल आणि योग्य ते आदेश परिवहन मंत्री तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना द्याल हीच अपेक्षा, असे पत्र राज यांनी लिहले आहे.
हे ही वाचा -कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ५९ डेपो बंद!