मुंबई - भारतात एकही चौक, रस्ता कलाकाराच्या नावाने नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ते बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवरही ताशेरे ओढले. आताच्या सरकारला कलेतील काही कळत नाहीच. पण, पुढचे सरकारही औरंगजेबाचेच असेल असे ते म्हणाले.
जहांगीर आर्ट गॅलरीत ऑल इंडियाच्या १२७ व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे यावेळी उद्घाटन झाले. तसेच, सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या चित्र प्रदर्शनाच्या कॅटलॉगचेही प्रकाशन ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. सुहास बहुलकर यांना राज ठाकरे यांच्या हस्ते रुपधर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज ठाकरेंनी आयोजकांना फटकारले. ते म्हणाले, की तुम्ही सरकारकडून मदतीची अपेक्षा करता. पण, पालिका राज्याकडे आणि राज्य केंद्राकडे जबाबदारीची टोलवाटोलवी करते.
ठाकरे म्हणाले, की कलेचे विश्व 2 लाखात निर्माण होणे शक्य नाही. सरकारकडे डोके आपटले, तरी काही होणार नाही. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री शाळेत चित्रकलेचा विषय नको असे म्हणतात. त्या सरकारकडे आपण कलेच्या मदतीसाठी जातो. भारतात एकही चौक, रस्ता कलाकारच्या नावाने होत नाही हे दुर्दैव असल्याची खंतही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.