मुंबई- गुढीपाडव्यानिमित्त शिवाजीपार्क मैदानावर आयोजित सभेत राज ठाकरेंनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली. नोटाबंदी, डिजिटल इंडिया, गोमांसबंदी, सरकारी योजना आणि भाजपची जाहिरातबाजी आदी विषयांवरून त्यांनी नरेंद्र मोदींना आणि भाजपला झोडपून काढले. यावेळी त्यांनी मोदींशी संबंधित अनेक व्हिडीओ क्लिप्स दाखवत सरकारची पोलखोल केली.
नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाची चांगली संधी मिळाली होती. मात्र, त्यांना या संधीचे सोने करता आले नाही, असे राज ठाकरे म्हणाले. आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे खोटे बोलत आहेत, हे सांगणारे अनेक व्हिडिओ दाखवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाचा नारा दिला होता. तो कसा खोटा आहे, हे दाखवण्यासाठी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत व्हिडिओ सादर केला. डिजिटल व्हिलेज म्हणून विदर्भातल्या हरिसाल या गावाचे उदाहरण त्यांनी दिले. त्या गावात असलेली विदारक स्थिती राज ठाकरेंनी उघडी पाडली. या गावातील आरोग्य केंद्र, इंटरनेट सुविधा, बँकेच्या सुविधा याबाबत उपस्थितांना चित्रफिती दाखवल्या.
गावकऱ्यांनी गावाची आणि डिजिटल इंडियाची सत्य स्थिती मुलाखतीत सांगितल्याच्या चित्रफिती ठाकरेंनी दाखवल्या. हरिसाल गावात जागोजागी मोबाईलसाठी टॉवर उभे केले आहेत. मात्र, वायफायला रेंजच नाही. डिजिटल इंडिया काय आहे? हेच आम्हाला माहीत नाही, असे उत्तर ग्रामस्थांनी दिले. स्वाईप मशीनही अनेक दुकानांमध्ये नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. एवढेच काय अनेकांकडे एटीएम कार्ड नाहीत, बँकेने एटीम कार्ड दिले नसल्याचेही गावकऱ्यांनी म्हटले आहे. काही गावकऱ्यांकडे तर मोबाईलही नाही. मग, मोदींनी हे गाव डिजिटल झाल्याचा दावा कसा केला? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. हरिसालची जाहिरात काय केली होती आणि परिस्थिती काय आहे हे राज ठाकरेंनी सांगितले.
सरकारच्या जाहिरातीत जो मुलगा आहे तोही मनसेने शोधला. या मुलानेही आपल्याकडे स्वाईप मशीन, पेटीएम, एटीएम कार्ड नसल्याचे सांगितले. 'मी लाभार्थी, होय हे माझं सरकार' म्हणणाऱ्या या जाहिरातीतील मॉडेलकडेही डिजिटल इंडियाच्या काहीही सुविधा पोहचल्या नाहीत, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. यानंतर उपस्थितांनी 'चौकीदार चोर है' अशा घोषणा दिल्या. लोकांना किती फसवायचं? किती लुटायचं याला काही मर्यादाच मोदींनी ठेवल्या नाहीत, असाही आरोप राज ठाकरेंनी केला.
काँग्रेसच्या सगळ्या जुन्या योजनांची नावे भाजपने बदलल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. प्रधानमंत्री जनधन योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना, सरदार पटेल नॅशनल अर्बन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, असे योजनांची नावे बदलली. काँग्रेसनेही असेच केल्याचे ठाकरे म्हणाले. राजीव गांधी किंवा पंतप्रधान या नावांशीवाय दुसरी नावे देता येत नाही का? दुसरी माणसे आले नाहीत का? इतकी कर्तृत्वमान व्यक्ती देशामध्ये जन्माला आले, तरी एकाचेही नाव योजना किंवा महामार्गांना देता येत नाही? असा सवाल त्यांनी केला.
आधारकार्डबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुटप्पी भूमिका त्यांनी दोन व्हिडिओमधून लोकांना दाखवली. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याअगोदर आधार योजनेला विरोध होता. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी याच योजनेचे गुणगान गायल्याचे त्यांनी व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून दाखवले. गंगा नदी साफ करण्याच्या मोहिमेला २० हजार कोटी वापरले गेले. मात्र, नदी साफ झाली नाही. असे ते म्हणाले. गंगा नदी स्वच्छ करण्याच्या मागणीसाठी अग्रवाल १११ दिवस उपोषणाला बसले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, मोदी त्यांना भेटण्यासाठी गेले नाहीत. गंगा नदी साफ करण्यासाठी जी समिती नेमली आहे, त्या समितीच्या एकाही बैठकीसाठी नरेंद्र मोदी गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
मुद्रा लोन ५९ मिनिटांत मिळणार या योजनेतून एचडब्ल्यू या अहमदाबादमधील खासगी कंपनीला आर्थिक लाभ दिल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. कॅपिटल वर्ड प्रायव्हेट लिमिटेड ही गुजरातमधील खासगी कंपनी असून तीचा संचालक विकास शहा आणि अखिल हंडा ही व्यक्ती २०१४ च्या निवडणुकीवेळी मोदींच्या जवळ होती, असे ते म्हणाले. मुद्रा लोन अंतर्गत लोन हवे असल्यास १०८८ रुपये खासगी कंपनीला भरायचे आणि प्रथम त्यांची परवानगी आणायची मग कर्ज मंजूर होणार, असा व्हिडिओ त्यांनी दाखवला.
गोमांस बाळगल्यावरून उत्तरप्रदेशमध्ये एका व्यक्तीला मारहाण झाली. मात्र, नंतर ते गोमांस नसल्याचे उघड झाले. राजस्थानमध्ये अन्नाविना ७० हजार गायींचा मृत्यू झाला, असेही राज यांनी यावेळी सांगितले.