मुंबई- मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला होता. त्यामुळे रेड अलर्ट मुंबईसाठी जारी करण्यात आला आहे. तर, पुढील ४८ तासात मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पुढील ४८ तासात मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा
4 आणि 5 ऑगस्टला मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला होता. त्यामुळे रेड अलर्ट मुंबईसाठी जारी करण्यात आला आहे. तर पुढील ४८ तासात मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पावसामुळे दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर हे जलमय झाले आहेत. रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली असून मध्य रेल्वेवरील वाहतूक धीम्यागतीने धावत आहे. तर, अनेक झोपडपट्टी भागातील घरात देखील पाणी शिरले आहे. कांदिवली येथे डोंगराचा काही भाग कोसळल्याने मीरा रोडहून मुंबईकडे येणारी वाहतूकही ठप्प झाली. आज सकाळी 8 वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेने 220 तर सांताक्रूझ वेधनशाळेने 254 मिमी पावसाची नोंद केली आहे. राममंदिर 152 मिमी, महालक्ष्मी 172, विद्याविहार 159 मिमी, या ठिकाणी जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना कारण नसताना घराच्याबाहेर न पडण्याचं पालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
तर, सोमवारी सायंकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे.मुसळधार पावसामुळे शहर विभागात 203.06, पूर्व उपनगरात 162.83, पश्चिम उनगरात 162.28 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईत जोरदार पाऊस पडल्याने हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, भेंडी बाजार जंक्शन, षण्मुखानंद हॉल, गोयल देऊळ, शेख मिस्त्री दरगाह मार्ग, कांदिवली, मालाड, अंधेरी, नॅशनल कॉलेज वांद्रे आदी भागात पाणी साचले आहे. पाणी साचल्याने या विभागातील रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. बेस्टचे 56 मार्ग वळवण्यात आले आहेत.