मुंबई -दहा वर्षांपूर्वी दहावीचे शिक्षण पूर्ण करता न आलेल्या पुजा अहिरेने दोन मुले सांभाळत आणि दिवसभर अनेक ठिकाणचे घरकाम करून दहावीच्या परीक्षेत गरूड भरारी घेतली. तिने शाळेत पहिली येण्याचा मान मिळवला. परिस्थितीवर मात करत तिने दहावीत उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
पुजा वाशीनाका येथे असलेल्या डॉ. भीमराव आंबेडकर शाळेत २००८ मध्ये नववीत शिकत होती. मध्येच शिक्षण सुटले आणि अल्पवयातच तिला लग्नाला सामोरे जावे लागले. त्याच दोन मुले झाली. पुढे शिक्षणाचा मार्गच बंद झाला. पती, सासू यांचा विरोध होता. मात्र, मनात शिक्षणाची जिद्द कायम होती. हातावर पोट असतानाही पुजाला खूप शिकायचे होते. शिकून पोलिसात जायचे होते. त्यातूनच मार्ग मिळाला आणि तिने घरकाम करत आपल्या मुलांचा सांभाळ करत पुढील शिक्षण घ्यायचे ठरवले.
शिकण्यासाठी आई-वडिलांकडे राहण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या आई-वडिलांसोबत वाशी नाका येथील सह्याद्री नगरच्या टॉवर हिल परिसरात राहायला गेली. घाटलागावात असलेल्या न्यु इरा शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर आईसारखेच दररोज दिवसभर घरकाम करायचे आणि रात्री शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचे. पुन्हा घरी येऊन अभ्यास करायचा, असा तिचा नित्यक्रम सुरू झाला.
पुजाने ६४.०० टक्के गुण घेऊन दहावीमध्ये उत्तीर्ण होण्याचे तसेच शाळेतून पहिले येण्याचे स्वप्न पूर्ण केले. यासाठी तिला लहान भावाने खूप प्रेरणा दिली. तसेच सहकार्य केले. सोबत आतेभाऊही रात्र शाळेत शिकत होता. त्यांनी मध्येच शाळा सोडली. मात्र, पुजाने जिद्द सोडली नाही. शिक्षक ही पालकांसारखे भेटले. ते अडचणीच्यावेळी मदत करत होते. पाठीवर थाप देत होते. सकाळपासून ते रात्रीपर्यंत आम्हाला अधिकचे वर्ग घेऊन परीक्षेच्या काळात तयारी करून घेत होते. त्यामुळे दहावीत हे यश मिळाल्याचे पुजा म्हणाली.
शाळेत अत्यंत उपेक्षीत आणि शिक्षणापासून दूर असलेले विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेत असतो. यावेळी दहावीत सहा मुले यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. अशा रात्र शाळा आणखी चांगल्या चालण्यासाठी सरकारनेदेखील मदत करावी, असे न्यू इरा शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र शिंदे म्हणाले.