मुंबई - शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सरसकट कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, ते आश्वासन त्यांनी पूर्ण केले नसल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. त्याबद्दल स्थगन प्रस्ताव आम्ही वरच्या सभागृहात मांडणार असल्याचे दरेकर म्हणाले.
'कर्जमाफीवरुन विरोधक आक्रमक, स्थगन प्रस्ताव विधानपरिषदेत मांडणार'
कर्जमाफीच्या मुद्यावरुन भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या मुद्यावरुन भाजपने महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.
महाविकास आघाडी सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राज्याची आर्थिक स्थिती, शेतकरी कर्जमाफी, यासह विविध मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा होणार आहे. आज पहिल्याच दिवशी भाजप सदस्यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधी घोषणा देऊन भाजपने आक्रमक होणार असल्याचा चुणूक दाखवली आहे. कर्जमाफीच्या मुद्यावरुन प्रविण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. या सरकार मध्ये विसंवाद एव्हढा शिगेला पोहोचला आहे की, त्यामुळे हे सरकार कधीही पडू शकते, असे वकत्व्य दरेकर यांनी केले.