मुंबई :उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा ठाकरे पिता-पुत्रांचा कट उद्योगक्षेत्रानेच उधळूण लावल्याचे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. परिषदेच्या पहिल्याच सत्रात महाराष्ट्रात १.३७ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करून जागतिक उद्योगक्षेत्राने महाराष्ट्राला पसंतीची पहिली पावती दिली आहे.
गेल्या वर्षी दावोसच्या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्र्यांची पाठ :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास दाखविला आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी बुधवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या परिषदेकडे तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली. तर आदित्य ठाकरे यांनी या परिषदेच्या निमित्ताने स्वित्झर्लंडची पिकनिक पार पाडली होती, असा टोलाही दरेकर यांनी मारला.
ठाकरे पितापुत्रांचा महाराष्ट्रास बदनाम करण्याचा कट :महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा खोटा प्रचार करून उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रचाराची राळ उठवली व उद्योग विश्वात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मात्र, ठाकरे कुटुंबाचे आरोप धादांत खोटे केवळ राजकीय वैफल्यातून होत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले. आता दावोस परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या प्रतिसादामुळे ठाकरे पितापुत्रांचा महाराष्ट्रास बदनाम करण्याचा कट उधळला गेला आहे, असा प्रतिहल्ला त्यांनी केला.