मुंबई -मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर आसल्फामधील प्रभाग क्रमांक 159चे भाजप नगरसेवक प्रकाश मोरे ( Prakash More Corporator Post Canceled ) यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश लघु वाद न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्या जागी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या शिवसेनेच्या उमेदवार कोमल जामसांडेकर ( Komal Jamsandekar ) यांना नगरसेवक पदी नियुक्त करण्याचे आदेशही कोर्टाने महापालिकेला दिले आहेत.
मोरे यांनी माहिती लपवली -
मुंबई महापालिकेची निवडणूक 2017मध्ये झाली होती. घाटकोपरमधील असल्फा परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 159मधून भाजपाकडून प्रकाश मोरे, तर शिवसेनेकडून कोमल जामसंडेकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यात प्रकाश मोरे हे विजयी झाले. प्रकाश मोरे यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांची माहिती लपवल्याची तक्रार कोमल जामसंडेकर यांनी केली होती. गँगस्टर अरुण गवळी याने खून केलेल्या कमलाकर जामसंडेकर यांच्या कोमल जामसंडेकर या पत्नी आहेत.