मुंबई- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ईटिव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीत आंबेडकरांकडून मराठा समाजाच्या उमेदवारी बाबत संकेत देण्यात आले.
मराठा समाजाच्या वंचित आघाडीत समावेश होण्याच्या प्रश्नावर बोलताना आंबेडकरांनी, 'आपण कोणाचेही नाव सांगणार नाही. पण विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या यादीतून खरे चित्र स्पष्ट होईल' असे सांगितले. यामुळे विधानसभेला वंचितमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा समाज समावेश होईल असे चित्र दिसत आहे.
प्रकाश आंबेडकर यांची ईटिव्ही भारतला मुलाखतीत ईव्हीएम मशीनबाबत न्यायालयाने आपली भूमिका मांडावी
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीन या हॅकिंग होत नाही, त्यात फेरफार करता येत नाही असे स्पष्टपणे जाहीर केले होते. परंतु मतमोजणीनंतर जे काही चित्र समोर आले त्यातून आमचा संशय वाढला आहे. आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद, नागपूर या खंडपीठात ३१ याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर लवकर सुनावणी व्हावी अशी आमची मागणी आहे. तसेच ईव्हीएमबाबत न्यायालयानेच आपली बाजू मांडावी, अशी अपेक्षा आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केली.
एमआयएमकडून जागांबाबत कोणताही प्रस्ताव नाही
वंचितचा मित्रपक्ष एमआयएमकडून आलेल्या प्रस्तावाबाबत विचारले असता, लोकसभा निवडणुकीत एमआयएमसोबत आम्ही मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेसाठीही आम्ही एकत्र निवडणुका लढविणार असल्याचे ठरविले आहे. परंतु, एमआयएमने आमच्याकडे जागेसाठी कोणत्याही प्रकारची मागणी केलेली नाही. असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे स्पष्टीकरण आंबेडकर यांनी दिले.