मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द केली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे याबाबत नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आपला अहवाल तयार केल्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आपला प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मूल्यांकनाबाबतच्या हालचालींना वेग
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात माजी सिनेट सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. परीक्षा रद्द केल्याचा आदेश काढण्यात आला असला तरी निकालाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. 'तुम्ही शिक्षणाचा खेळखंडोबा करताय का, असे खडे बोल उच्च न्यायलयाने राज्य सरकारला सुनावले आहे. त्यानंतर राज्य सरकराच्या दहावी मूल्यांकनाबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सादर करून काही दिवस उलटून गेले तरी अंतिम निर्णय होत नव्हता. अखेर उच्च न्यायलयाने राज्य सरकारला झोपल्यानंतर राज्य सरकारकडून येत्या दोन दिवसांत निर्णय होऊ शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.