मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदी सुरू आहे. पण, जेवणाची अडचण भासत असल्याने परप्रांतीय रोजंदारी कामगार, फेरीवाले हे मिळेल त्या साधनाने आपले घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. असेच उत्तर प्रदेश व बिहारला जाणाऱ्या 4 ट्रकमधील 350 लोकांना मानखुर्द पोलिसांनी शनिवारी (दि. 28 मार्च) रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
संचारबंदीत चार ट्रक भरुन निघालेले 350 परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात
संचारबंदीचे उल्लंघन करत चार ट्रकमधून उत्तर प्रदेश व बिहारला जाणाऱ्या 350 परप्रांतियांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता राज्यात संचारबंदी लागू केली होती. मात्र, मुंबईत आलेल्या परप्रांतीय आपापल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते विविध शक्कल लढवत आहेत. असेच मुंबईतील विविध भागातून उत्तर प्रदेश, बिहार येथील सुमारे 350 जण चार ट्रकमधून रात्रीत निघून जाण्याचा प्रयत्न करत होते. मानखुर्द पुलाजवळ नाकाबंदीत ट्रक अडवून पोलिसांनी चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात जमावबंदी व संचारबंदी आदेशाचा भंग केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -कोरोनाने डॉक्टरचा मृत्यू, सैफी रुग्णालय १४ एप्रिलपर्यंत बंद