मुंबई - प्लाझ्मा थेरपी केलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने या उपचार पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर केलेली ही पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याचे खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. आज या ५३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
५३ वर्षीय रुग्णाला सर्दी, ताप आणि फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने २० एप्रिल रोजी उपचारासाठी लिलावतीत दाखल करण्यात आले होते. या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे प्लाझ्मा थेरपी करण्याचा निर्णय लीलावती रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. याबाबत त्यांनी पालिका प्रशासनाकडून परवानगी मागितल्यानंतर शनिवारी नायर रुग्णायातून कोरोनामुक्त झालेल्या ‘दाता’ रुग्णाच्या रक्तातून अँटिबॉडिज मिळवून प्लाझ्मा तंत्रज्ञानाने उपचार करण्यात आले होते. मात्र, त्या रुग्णाचा आज मृत्यू झाला.
लीलावती रुग्णालय प्रशासनाच्या मागणीनंतरच रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यास परवानगी देण्यात आली होती. यानुसार शनिवारी प्लाझ्मा थेरपी करण्यातही आली. ६०० मिलीलिटर पैकी २०० मिलीलिटर त्याला प्लाझ्मा देण्यात आला. प्लाझ्मा दिल्यावर या रुग्णाच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती निर्माण होईल, अशी अपेक्षा रुग्णालयाला होती. मात्र, त्या रुग्णाच्या प्रकृतीमध्ये कोणतेही बदल झाले नाहीत. गेले 4 दिवस हा रुग्ण क्रिटिकल अवस्थेतच होता. अखेर बुधवारी रात्री ११.३० च्या दरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पालिकेचे तज्ज्ञ डॉक्टर लीलावती रुग्णालयाशी चर्चा करीत आहेत. त्यांच्याकडून मृत्यूच्या कारणांबाबत अहवाल मागवण्यात आला आहे.
‘प्लाझ्मा’ थेरपी केलेल्या रुग्णाचा लिलावती रुग्णालयात मृत्यू
मुंबईतीस लिलावती रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी केलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या उपचार पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर २४ तासात मृत्यू -
वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये पालिकेच्या परवानगीने पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. आरोग्य मंत्र्याच्या घोषणेला २४ तास उलटत नाही तोच पहिली प्लाझ्मा थेरपी केलेल्या ५३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे या थेरपीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
"प्लाझ्मा’ थेरपी"ला परवानगी नाही -
"प्लाझ्मा’ थेरपी"ला परवानगी दिली नसून त्यावर सखोल संशोधन सुरू आहे. प्लाझ्मा थेरेपी यशस्वी न झाल्यास रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे हा प्रयोग करण्यापूर्वी सर्व प्रकारची खातरजमा करणे गरजेचे असल्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काय आहे प्लाझ्माा थेरपी?
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील ८०० मिली रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून ॲण्टीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर हा प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याचं म्हटलं आहे.