महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत मलेरिया, गॅस्ट्रोच्या रुग्णात वाढ

By

Published : Aug 18, 2021, 3:48 AM IST

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच पावसाळी आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

mumbai
mumbai

मुंबई - मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच पावसाळी आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत मलेरियाचे 2943, तर गॅस्ट्रोचे 1731 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. तर नागरिकांनी काळजी घेण्याची आवाहन करण्यात आले आहे.

रुग्णसंख्या वाढली -

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यादरम्यान आजारांचे प्रमाण वाढते. यंदाही अशीच परिस्थिती समोर येत आहे. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान मलेरियाचे 2943, लेप्टोचे 123, डेंग्यूचे 138, गॅस्ट्रोचे 1731, हेपेटायसिसचे 150 तर एच 1 एन 1 चे 36 रुग्ण आढळून आले आहेत. या कालावधीत लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. जुलै 2021 मध्ये मलेरियाचे 784, लेप्टोचे 37, डेंग्यूचे 28, गॅस्ट्रोचे 294, हेपेटायसिसचे 48 तर एच 1 एन 1 चे 21 रुग्ण आढळून आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या 15 दिवसात मलेरियाचे 395, लेप्टोचे 27, डेंग्यूचे 61, गॅस्ट्रोचे 159, हेपेटायसिसचे 20 तर एच1एन1 चे 8 रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनासह पावसाळी आजारांचे आव्हान -

मुंबईत कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आली आहे. ही लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. आतापर्यंत मुंबईत डेल्टा प्लसच्या 11 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पालिकेचा आरोग्य विभाग कोरोना आणि त्याने बदललेल्या विषाणूचा प्रसार रोखण्याचे काम करत आहे. त्यातच पावसाळी आजार वाढल्याने आरोग्य विभागापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

पालिका सज्ज -

पावसाळी आजारांसाठी पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर, कस्तुरबा अशा प्रमुख रुग्णालयांसह सर्व १६ उपनगरीय रुग्णालये व इतर रुग्णालयात पावसाळी आजारांसाठी बेड उपलब्ध आहेत. गंभीर आजारी रुग्णांसाठीही आवश्यक असणारी सर्व औषधे पालिकेकडे उपलब्ध आहेत. तसेच रुग्णालय, घरोघरी आणि रॅपिड टेस्टच्या माध्यमातून चाचण्याही केल्या जात असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन -

दरवर्षी जुलैमध्ये होणार्‍या अतिवृष्टीत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांचा उपद्रव वाढून मलेरियासारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते. यावर्षीही पावसाळी आजार वाढले आहेत. पावसाळी आजार वाढल्यामुळे सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन पालिकेने केले आहे. शिवाय घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा असेही पालिकेने म्हटले आहे. मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार आजही आहे. कोरोना अद्याप संपूर्ण गेलेला नाही. यामुळे नागरिकांनी मास्क घालणे, सतत हात धुणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

गेल्या 7 महिन्यातील आकडेवारी -

1 जानेवारी ते 15 ऑगस्ट 2021 वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यात मलेरिया 2943, डेंग्यू 138 (1 मृत्यू), गॅस्ट्रो 1731, लेप्टो 123, एच1एन1 चे 36 रुग्ण आणि हेपेटायसीसचे 150 रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा -यवतमाळ : अंजी नाईक येथे जेवणातून 45 जणांना विषबाधा

ABOUT THE AUTHOR

...view details