मुंबई - भाजपकडून राज्यसभेच्या तीन उमेदवारांची यादी नवी दिल्लीत प्रसिद्ध करण्यात आली असून यात चर्चेत असलेले एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले आहे. याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली. यासंदर्भात मुंडे यांनी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांच्याशी खास बातचीत केली.
औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, नाथाभाऊ यांनाही उमेदवारी मिळायला हवी होती, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुंडे यांचेही नाव विधान परिषदेसाठी चर्चेत होते. मात्र, अंबरीश पटेल यांच्या गळ्यात परिषदेची माळ पडली आहे. याबाबत विचारणा केली असता मुंडे म्हणाल्या की, मी पक्षाकडून कोणतीही मागणी केली नाही. मात्र, नाथाभाऊ यांना राज्यसभेवर संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र, त्यांचे नाव यादीत नाही. नाथाभाऊंसाठी पक्षाने काही वेगळा विचार केला असेल. अजूनही मी भाजपमध्ये आहे, कामही करतच आहे, बघूया पुढे काय होते, असा नाराजीचा सूरही पंकजा मुंडे यांनी काढला.