मुंबई - पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा कॉरीडोरबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंढरपूर मंदिर परिसरातील समस्यांचा पाढा वाचला. कॉरीडोर करताना स्थानिकांना विश्वासात न घेतल्याने वाद निर्माण झाल्याचा मुद्दा सचिन अहिर यांनी उपस्थित केला. तसेत कॉरिडॉर सोलापूर आणि पुणे शहराला जोडणार का, असा प्रश्न विचारला. तर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाऊन आश्वासन दिल्यानंतर ही आंदोलन सुरुच आहे. (Pandharpur will be developed on the lines of Varanasi) विकासाला प्राधान्य देताना, कोणीही नाराज होणार नाही, अशी हमी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुरातन वास्तू आणि वाड्यांचा मुद्दा उपस्थित केला. नदीचे प्रदुषण कमी कसे करणार, विमानतळ उभारावे, अशी मागणी ही दानवेंनी केली. मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिले.
कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येणार - पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा राज्य आणि देशाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा आराखडा सर्वंकष होण्यासाठी वाराणसी आणि तिरुपती या देवस्थानाला सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे. त्याच धर्तीवर मंदिरात येणाऱ्या वारकरी भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, श्रींचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी मंदिरातील मूळ वास्तूचे व वारकरी सांप्रदायाच्या प्रथा परंपरेचे जतन करून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिर व परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी वाराणसी आणि तिरुपतीच्या धर्तीवर स्वच्छता, चांगले रस्ते, शौचालये, हॉस्पिटल आणि चंद्रभागा घाट याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.