मुंबईOxygen Plant Scam : कोविड काळात ऑक्सीजन जनरेशन प्लांटची उभारणीमध्ये 6 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी, आर्थिक गुन्हे शाखेचे (EOW) अधिकारी प्रिनाम परब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २२ नोव्हेंबरला नागपाडा पोलीस ठाण्यात (Nagpada Police Station) रेमिन छेडा (Romin Chheda) याच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम 418, 465, 467, 468, 471, 218, 120 ब आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने समन्स पाठवून २३ नोव्हेंबरला आरोपी रोमिन छेडा याला चौकशीला बोलावले होते.
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी: तब्बल आठ तास रोमिन छेडा याचा जबाब नोंदवल्यानंतर पुन्हा २४ नोव्हेंबरला चौकशीला बोलवण्यात आले होते. नंतर २४ नोव्हेंबरला चौकशीअंती आर्थिक गुन्हे शाखेने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आरोपी रोमिन छेडाला अटक केली. दोन वेळा पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आज कोर्टाने छेडाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी हायवे इन्फ्रा कंस्ट्रक्शनच्या संचालक नवनीत अगरवाल यांना उत्तर प्रदेशात EOWने समन्स पाठवला आहे. जर समन्स मिळाल्यानंतर दिलेल्या मुदतीत हायवे इन्फ्रा कन्स्ट्रक्शनचे संचालक मुंबईत चौकशीसाठी न आल्यास EOW चे पथक उत्तर प्रदेशमध्ये जाणार असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
महापालिकेकडून १३५ कोटींचे कंत्राट घेतले : उत्तर प्रदेशातील हायवे इन्फ्रा कंस्ट्रक्शन ही कंपनी असून त्याचे संचालक नवनीत अगरवाल हे प्रयागराज येथे राहतात. तसेच हायवे इन्फ्रा कंस्ट्रक्शन या कंपनीच्या नावे अटक आरोपी रोमिन छेडा याने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे महापालिकेकडून १३५ कोटींचे कंत्राट घेतले होते. जून २०२१ मध्ये हायवे इन्फ्रा कंस्ट्रक्शन या कंपनीच्या नावाने कंत्राट मिळाले होते. नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीसाठी जी दोन कंत्राटी दिली होती. त्यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या नऊ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीच्या कंत्राटाचे काम हे संबंधित साईट कंत्राटदाराच्या ताब्यात दिल्यापासून, 30 दिवसात पूर्ण करावयाची अट संबंधित निविदेत नमूद होती. मात्र या अटीप्रमाणे कंत्राटदार हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीकडून 30 दिवसांत काम पूर्ण न झाल्याने त्यांना निविदेतील अटी शर्तीनुसार मुंबई महानगरपालिकेने एकूण तीन कोटी 16 लाख 32 हजार 426 रुपयांचा दंड आकारला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.