महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आर्थर रोड कारागृहाची सुरक्षा रामभरोसे;  अनेक सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त

२०१३ साली या कारागृहात लावण्यात आलेले १२३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी बहुतांश कॅमेरे हे नादुरुस्त असल्यामुळे आर्थर रोड कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

mumbai
मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Dec 18, 2019, 8:42 PM IST

मुंबई- भायखळा परिसरातील आर्थर रोड कारागृह पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. आर्थर रोड कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असताना त्यांच्या सुरक्षेसाठी १२३ कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र, १२३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी जवळपास ९८ सीसीटीव्ही कॅमेरे जुने झाले असून त्यातले बहुतांश कॅमेरे बंद पडल्याची कबुली स्वतः जेल प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात एका सुनावणी दरम्यान दिली आहे. यावरून आर्थर रोड कारागृहाची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचे समोर येत आहे.

माहिती देताना आरोपीचे वकील अॅड. प्रकाश सालसिंगिकर

मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असलेल्या बॅरेक नंबर ११ मध्ये ठेवण्यात आलेल्या खटला सुरू असलेल्या कच्च्या कैद्यांपैकी एक हर्षद सोलंकी या कैद्याला तो शेंडी, दाढी ठेवतो म्हणून कारागृहाच्या पोलिसांनी मारहाण केली होती. जेल भेटीदरम्यान हर्षद सोलंकी याने मारहाणीत त्याच्या कानाला जबर इजा झाल्याचे त्याच्या वकिलांना सांगितले होते. यावर अॅड. प्रकाश सलसिंगीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सदर प्रकरण न्यायालयाच्या नजरेस आणून दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर हर्षद सोलंकी या आरोपीला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.

सुनावणी दरम्यान न्यायालयाने ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ च्या दरम्यान घडलेल्या प्रकाराचे सीसीटीवी फुटेज आर्थर रोड कारागृहाकडे मागितले होते. यावर जेल प्रशासनाकडून उत्तर देताना सांगण्यात आले होते की, आर्थर रोड कारागृहामध्ये लावण्यात आलेले १२३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी ९८ सीसीटीव्ही कॅमेरे हे फार जुने झालेले आहेत. त्यामुळे यातील बरेचसे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असून त्यांचे सुटे भाग बाजारात उपलब्ध नसल्यामुळे सीसीटीव्ही फुटेज देता येऊ शकत नाही, असे उत्तर देण्यात आले.

आर्थर रोड कारागृहात सध्या ८०० हून अधिक कैदी ठेवण्यात आलेले आहेत. या कारागृहामध्ये कच्च्या कैद्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, या कच्च्या कैद्यांमध्ये दरोडा, खून करणारे, गंभीर गुन्हे असलेले कैदीसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. २६ /११ च्या मुंबईवरील आतंकवादी हल्ल्याच्या वेळेस जिवंत पकडला गेलेला अजमल कसाब हा आतंकवादीसुद्धा आर्थर रोड कारागृहामध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, २०१३ साली या कारागृहात लावण्यात आलेले १२३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी बहुतांश कॅमेरे हे नादुरुस्त असल्यामुळे या कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

हेही वाचा-'...तर शिवसेनेने काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे'

ABOUT THE AUTHOR

...view details