मुंबई - पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले आहेत. सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. नालेसफाईच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार असल्याने पहिल्या पावसातच मुंबईची पोलखोल होते, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी तर मुंबई सोबतच ठाणे महापालिकेतही शिवसेनेच्या भ्रष्टाराचाराचा आणि दिरंगाईचा जनतेला फटका बसत असल्याची टीका केली. नालेसफाईचे टेंडर फेब्रुवारीमध्ये काढून मार्च-एप्रिलमध्ये फायनल करायचे असते. तसेच 'मे'मध्ये नालेसफाईची कामे पूर्ण करायची असतात. परंतु त्या काळात ते पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जूनच्या पहिल्या पावसातच मुंबई आणि ठाणे शहर ठप्प होते.
मुंबई असो वा ठाणे वर्षोनुवर्षे हे नालेसफाईचे काम करणारे कंत्राटदार तेच कसे असतात, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. सत्ताधारी भाजप-शिवसेना नाल्यातले पैसे खाते म्हणून मुंबई पाण्यात जाते. हे आता वेगळे राहिलेले नाही, असे म्हणत त्यांनी भाजप-शिवसेनेवर टीका केली.
मी लहानपणापासून मुंबई परिसरात राहतो. दरवर्षी मुंबईत त्याच त्याच जागावर पाणी भरते. जागाही बदललेल्या नाहीत. मागील २५-३० वर्षात महापालिकेच्या या कामाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले पाहिजे, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली.
तर मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि पहारेकरी भाजप नालेसफाईचे पैसे खात असल्यानेच मुंबई दरवर्षी पाण्यात जाते, असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केला आहे. नालेसफाईमध्ये सत्ताधाऱ्यांनी आपली घरे भरली. त्यामुळेच मुंबई तुंबली. जनतेला होणाऱ्या नाहक त्रासाला शिवसेना जबाबदार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.