महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कांद्याने ग्राहकांसह शेतकऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी, 9 हजार क्विंटल उच्चांकी भाव

पावसामुळे राज्यातील नवीन कांद्याचे नुकसान झाले असून, जुन्या कांद्याचा साठा कमी प्रमाणात आहे. त्यातच परराज्यांतून मागणी वाढल्याने कांद्याचे भाव कडाडले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचे भाव सरासरी 7 हजार ते 7 हजार 500 रुपये क्विंटल पर्यंत पोहचले असून किरकोळ बाजारात ग्राहकांना 80 रुपये दराने कांदा खरेदी करावा लागत आहे

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 20, 2020, 4:38 PM IST

Updated : Oct 20, 2020, 4:49 PM IST

मुंबई- पावसामुळे राज्यातील नवीन कांद्याचे नुकसान झाले असून, जुन्या कांद्याचा साठा कमी प्रमाणात आहे. त्यातच परराज्यांतून मागणी वाढल्याने कांद्याचे भाव कडाडले आहेत. घाऊक बाजारात नवीन कांद्याला प्रति किलो 30 ते 55 रुपये, तर जुन्या कांद्याला 50 ते 80 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात दर्जानुसार 80 ते 100 रुपये किलो या भावाने कांद्याची विक्री होत आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे भाव तेजीत राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लासलगावात आवक घटली

लासलगाव बाजार समितीनाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती ही कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती असून ह्या बाजार समिती मध्ये इतर वेळी 14 ते 15 हजार क्विंटल कांद्याची आवक होत असते..मात्र गेल्या आठ दिवसापासून ह्या बाजार समिती मध्ये केवळ 3500 ते 4000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होत असल्याने.कांद्याची मागणी जास्त आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाली असून सध्या कांद्याला सरासरी 7 हजार रुपये क्विंटल भाव मिळतं आहे..मध्यंतरीच्या काळात अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने नव्याने लाल कांदा बाजारात येणास दिवाळी उजडणार असल्याने तो पर्यँत कांद्या ग्राहकांना चढ्या दराने खरेदी करावा लागेल, असे मत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी सांगितलं आहे.

नाशकात भाव ७ हजार ते ७ हजार ५००

नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचे भाव सरासरी 7000 ते 7500 रुपये क्विंटल पर्यंत पोहचले असून किरकोळ बाजारात ग्राहकांना 80 रुपये दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी सर्वसामान्य गृहिणींनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे उन्हाळी कांदा केवळ 15 ते 20 टक्के शिल्लक असून नाशिकच्या सर्वच बाजार समिती मध्ये कांद्याची मागणी वाढली असली तरी आवक कमी होत असल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील अभोना उप-बाजार समितीमध्ये कांद्याला 9000 क्विंटल इतका उच्चांकी भाव मिळाला. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील लाल कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने लाल कांदा बाजारात येण्यास अजून महिना लागणार असल्याने पुढील काही दिवसात उन्हाळी कांद्याच्या भावात आणखीन वाढ होऊन सर्वसामान्य ग्राहकांना कांदा 100 रुपयेहून अधिक दराने खरेदी करावा लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यात कांद्याचा भाव चढाच राहणार

येथील मार्केटयार्डमध्ये मंगळवारी सुमारे 50 ते 60 ट्रक जुना, तर केवळ 300 गोणी नवीन कांद्याची आवक झाली. सध्या नवीन कांदा आता बाजारात येणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे सुमारे 50 ते 60 टक्के नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन कांदा चांगल्या प्रमाणात बाजारात दाखल होण्याची अपेक्षा आहे. पावसामुळे साठवणुकीतील जुना कांदा खराब झाल्याने त्याचा साठा कमी उपलब्ध आहे. बाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्याला मागणी आहे. त्यातच कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील कांद्याचे पीक येत असते. मात्र, पावसामुळे तेथील कांद्याच्या पिकांवर परिणाम झाला आहे. परराज्यांतून सुकलेल्या आणि वाळलेल्या कांद्याला मागणी आहे. त्यामुळे कांद्याचे भाव तेजीत असून, पुढील काही दिवस कांद्याचे भाव वाढतच राहणार असल्याचे पुणे मार्केटयार्डातील तरकरी विभागाचे प्रमुख हनुमंत कळमकर यांनी सांगितले.

नवी मुंबई बाजारपेठेत कांदा १०० रुपये किलो

नवी मुंबईत कांद्याच्या भावाने ३ हजार ९०० रुपये क्विंटलवरून ४ हजार १०० रुपये क्विंटलपर्यंत उसळी खाल्ली आहे. किरकोळ बाजारात कांदा प्रति किलो ६० ते ७० रुपयांनी विकला जात आहे, तर जुना कांदा ८० ते १०० रुपये दराने विकला जात आहे. घाऊक बाजारात कांदा ४५ ते ५० रुपये किलोने विकला जात आहे. काही दिवसांपूर्वीच देशात कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक होता. मात्र, साठवलेला कांदा आणि शेतातील कांदा दोन्हीही पावसामुळे खराब झाले आहेत. परिणामी आता बाजारात कांदा येत नसल्याचे चित्र दिसत आहे.

साताऱ्यात जुन्या कांद्याला चांगला भाव

साताऱ्याच्या किरकोळ बाजारात कांदा ८० ते १०० रुपये किलोने विक्रीला जात आहे. हा दर दिवाळीपर्यंत चढता राहील, असा अंदाज विक्रेते व्यक्त करत आहेत. सातारा मार्केट यार्डमधील सत्तारभाई गुलाब बागवान फर्मचे प्रोप्रायटर महंमदभाई बागवान यांनी सांगितले. गेल्या आठवडाभरात कांद्याचा दर वाढला. नाशवंत पिक असल्याने कांद्याचा भाव काही दिवस वाढता राहील. सातारा जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात लोणंदच्या गारव्या कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. लोणंद बाजार समितीमधील कांद्याचे प्रमूख व्यापारी बिपीनशेठ शहा यांनी सांगितले, पावसाने नव्या कांद्याला फटका बसल्याने जुन्या कांद्याला भाव आला आहे. शेतकऱ्याने नवीन लागण करून कांद्याचे पिक हाती येईपर्यंत तीन-साडेतीन महिने लागतील. साधारण फेब्रुवारीपर्यंत नवा कांदा बाजारात येईल, तोपर्यंत कांद्याचा भाव असाच चढता राहील.

औरंगाबादेत कांदा जाणार दीडशेवर

पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने कांदा जमिनीतच सडला. त्यामुळे नवा कांदा बाजारात आलाच नाही. परिणामी कांद्याचे दर गगनाला भिडले आहे. या जिल्ह्यात आसपासच्या गावांमधून कांदा बाजारात येत होता. मात्र गेल्या महिनाभरापासून स्थानिक कांद्याची आवक कमी झाली आहे. तीन आठवड्यांपूर्वी 25 ते 30 रुपये किलो कांदा होता. मात्र अचानक पावसामुळे नवा कांदा येणे बंद झाले आणि जुना कांदा खराब होत असल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. स्थानिक कांदा कमी झाल्याने नगर जिल्ह्यातून कांदा औरंगाबादचे व्यापारी मागवत आहेत. त्यामुळे तो कांदा सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरापर्यंत जाताना तो 90 रुपयांपर्यंत जात आहे. काही दिवसात कांद्याचे दर शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. औरंगाबादच्या जाधववाडी बाजारात रोज अंदाजे बाराशे गोणी कांदा येतो. हीच आवक 500 ते 550 गोणी पर्यंत गेली आहे. नवीन कांदा येण्यासाठी जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत तरी कांद्याचे दर स्थिर होण्याची शक्यता वाटत नसल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातील कांदा गायब होण्याची शक्यता औरंगाबादच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र देशात नंबर एक

देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. देशभरातील सुमारे ८० टक्के कांदा महाराष्ट्रात घेतला जातो. नाशिकजवळ असलेली लासलगावची बाजारपेठ सर्वात मोठी बाजारपेठ आहे. २०१९-२० मध्ये महाराष्ट्रातून ११७ लाख टन कांद्याचे उत्पादन घेण्यात आले. आतापर्यंत घेण्यात आलेल्या उत्पादनापैकी हे विक्रमी उत्पादन आहे. यापैकी १०० लाख टन रब्बी पिक होते. एप्रिल ते ऑक्टोबर या दरम्यानची गरज यातून भागविली जात होती.

निर्यात बंदी

14 सप्टेंबर २०२० रोजी केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही शेतकरी नेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. कांद्याची निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती.

Last Updated : Oct 20, 2020, 4:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details