मुंबई - मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईकरांच्या संपर्कात येणाऱ्या फेरीवाले, बेस्ट उपक्रमातील कर्मचारी, एसटी महामंडळातील कर्मचारी अशा दोन लाख 'हायरिस्क' लोकांची कोरोना चाचणी केली. त्यात १ हजार ६०० व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
कोरोनाच्या दृष्टीने धोकादायक क्षेत्रातील लोक -
मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. कोरोनाचा प्रसार वाढू नये, म्हणून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले, त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ही मोहीम आजही सुरू आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना थंडी आणि जगभरात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुंबईतही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजी मार्केट मधील दुकानदार, बेस्ट उपक्रमातील कर्मचारी विशेष करून चालक व वाहक, एसटी महामंडळातील वाहक व चालक अशा 'हायरिस्क'वर असलेल्या लोकांचा दिवसभरात शेकडो-हजारो लोकांचा संपर्क येतो. या लोकांना कोरोना झाल्यास ते अनेकांमध्ये कोरोनाचा प्रसार करू शकतात. त्यासाठी मुंबई महापालिकेने अशा लोकांची चाचणी करण्यास सुरुवात केली. गेल्या चार महिन्यांत 'हायरिस्क' अशा दोन लाख लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. या चाचणीत फक्त १ हजार ६०० जण कोरोनाबाधित आढळल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.