मुंबई- राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना शासकीय रुग्णालयातील परिचारिका आक्रमक झाल्या आहेत. ७ दिवस क्वारंटाईनसाठी सुट्टी मिळावी या मागणीसह पदोन्नती, पदनिर्मिती आणि पदभरती या प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिकांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील जे.जे रुग्णालयासह २५ जिल्ह्यातील रुग्णालयातील परिचारिकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. हे आंदोलन 7 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
मागण्या मान्य झाल्या नाही, तर ८ सप्टेंबरला काम बंदचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या सचिव सुमित्रा तोटे यांनी दिला आहे. राज्यभर कोविडचे रुग्ण वाढत आहेत. अशा वेळी परिचारिकांची मोठी कमतरता भासत आहे. त्यामुळे, सध्या काम करणाऱ्या परिचारिकांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. असे असताना सरकार पदभरती, पदनिर्मिती आणि पदोन्नती याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. त्याचवेळी जिवाची पर्वा न करत कोरोनाशी दोन हात करणाऱ्या परिचारिकांना केवळ ३ दिवस क्वारंटाईनसाठी दिले जात आहे. जेव्हा की ७ ते १४ दिवसानंतर लक्षणे दिसून येतात. अशावेळी परिचारिकांना संसर्गाची भीती वाटत आहे. म्हणून ७ दिवस क्वारंटाईनसाठी सुट्टी द्यावी, अशी परिचारिका संघटनेची मागणी आहे.