मुंबई: जोगेश्वरी-विक्रोली लिंक रोड(जेव्हीएलआर)वरील आयआयटी पवई ते गांधीनगर एलबीएस मार्गाला जोडणारा संपूर्ण रस्ता खचला आहे. मागील दीड महिन्यापासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने येथील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावरून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
जोगेश्वरी ते गांधीनगरकडे जाणाऱ्या जेव्हीएलआर द्रुतगती मार्गावर मेट्रोचेही काम सुरू आहे. त्यामुळे बेरिकेटस लावून वाहनांना पर्यायी डांबरी रस्ता बनवून दिला आहे. लॉकडाऊन काळात या मार्गावर काम बंद होते आणि वाहनांची वर्दळही कमी होती. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जेव्हीएलआरवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जेव्हीएलआर हा मुख्य मार्ग असून तो पूर्व द्रुतगती मार्ग व पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडला जातो. सिप्झ, साकीनाकाचे मार्गावरील वाहनेही याच जेवीएलआरवरून मार्गस्थ होतात. मात्र, या वर्दळीच्या रस्त्यांकडे प्रशासनाने योग्य वेळी लक्ष न दिल्याने जेवीएलआर रस्ते अपघात प्रवण क्षेत्र बनत चालले आहे. रस्त्यावर खड्डे आणि रस्ता खचल्याचे उघडपणे दिसत असताना संबंधित प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने, वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.