मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मुंबईतील आकाशवाणी येथील आमदार निवासांमध्येही अभ्यागतांसाठी (पाहुण्यांसाठी) प्रवेशबंदी करण्यात आली आहे. राज्य शासनाच्यावतीने विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी त्यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. नुकतेच मंत्रालयातील आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी केली आहे.
हेही वाचा -Corona Updates : अमिताभ बच्चन यांनी घेतली कोरोनाची लस
धोका वाढल्याने खबरदारी
राज्यात झपाट्याने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे. दोन्ही आमदार निवासांमध्ये वास्तव्यास असलेल्या सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सदस्यांचे कार्यकर्ते, अभ्यागत, तसेच मुंबईत औषधोपचारासाठी येणाऱ्यांना आमदार निवासात प्रवेश बंदी घातली आहे. त्यामुळे आमदार, त्यांचे कुटुंबीय आणि एक अधिकृत स्वीय साहाय्यक यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या जिवाला धोका निर्माण होईल, म्हणून आकाशवाणी आणि विस्तारित आमदार निवासामध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश बंदी घातल्याचे परिपत्रकात नमूद आहे.
मंत्रालयातील कामकाज वेळा बदलल्या
कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मंत्रालयातील कामकाजाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. प्रत्येक विभागाला तशा सूचना दिल्या आहेत. संपूर्ण राज्याच्या कारभाराचा गाडा येथून हाकला जातो त्या मंत्रालयातही काही दिवसांपूर्वी कार्यालयीन वेळापत्रकात बदल केले आहेत. आता मंत्रालयात दोन शिफ्टऐवजी एक दिवसाआड काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -रविंद्र वायकरांचा किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा