महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 15, 2020, 6:15 PM IST

ETV Bharat / state

"एकही बालक पोषण आहारापासून वंचित राहणार नाही"

कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बालकांना अंगणवाडीमध्ये न बोलावता त्यांच्या घरीच एचसीएमऐवजी घरपोच पोषण आहार (टीएचआर) देण्याचा निर्णय महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी घेतला आहे.

yashomati thakur
महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई - अंगणवाडी सेविकांच्यामार्फत वितरीत केला जाणारा घरपोच पोषण आहार (टीएचआर) येत्या आठवडाभरात सर्व बालकापर्यंत पोहोचविला जाईल. एकही बालक, गर्भवती माता, स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित राहणार नाही, असे महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. ॲड. ठाकूर यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोषण आहार पुरवठा, अंगणवाडी सेविकांचे मानधन, बाल संस्थांसाठीचे अनुदान वितरण आदींबाबत आढावा घेतला.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, महिला व बालविकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, एकात्मिक बालविकास योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो उपस्थित होत्या. घरपोच पोषण आहार वेळेत पोहोचण्यासाठी ॲड. ठाकूर यांनी संबंधितांना निर्देश दिले.

कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर पोषण आहार पुरवठ्यामध्ये काही अंशी अडचणी उद्भवल्या होत्या. भारतीय अन्नधान्य महामंडळामार्फत पोषण आहारांअंतर्गतचे धान्य उपलब्ध झाले होते. तथापि, लॉकडाऊनमुळे हे धान्य वाहनात भरण्यासाठी कामगार उपलब्ध नसल्याने तसेच धान्याच्या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला होता.

ॲड. ठाकूर यांनी सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून पोषण आहाराच्या धान्याची उचल तसेच वाहतूक त्वरीत होईल, या अनुषंगाने निर्देश दिले. त्यानुसार धान्य उपलब्ध होण्याची कार्यवाही सुरू झाली असून सर्व जिल्ह्यात हे धान्य पोहोचले आहे. एप्रिल तसेच मे 2020साठी गर्भवती माता, स्तनदा माता तसेच 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांसाठीचा घरपोच पोषण आहार (टेक होम रेशन-टीएचआर) नियमित पद्धतीनुसार वितरीत करण्यात आला आहे.

3 ते 6 वयोगटातील बालकांना अंगणवाडीमध्ये गरम ताजा आहार (हॉट कुक्ड मील- एचसीएम) दिला जातो. परंतु, कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बालकांना अंगणवाडीमध्ये न बोलावता त्यांच्या घरीच एचसीएमऐवजी घरपोच पोषण आहार (टीएचआर) देण्याचा निर्णय घेतला आहे. या वयोगटातील बालकांसाठीचे घरपोच पोषण आहाराचे नियतन जिल्हास्तरावर वितरणाची कार्यवाही सुरू असून दि. 20 एप्रिल 2020पूर्वी सर्व राज्यभरात वितरीत केला जाईल याची खात्री करावी, असे निर्देशही महिला व बालविकास मंत्री यांनी यावेळी दिले.

अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस खूप चांगल्या पद्धतीने काम करत असून घरोघरी जाऊन कोरोना बाबत जनजागृतीचे काम केले जात आहे. महिला व बालविकास विभाग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन तसेच बाल संस्थांसाठीच्या अनुदान वितरणाबाबतही शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details