मुंबई - शिवसेनेने स्पष्ट भूमिका घेतल्यास राज्यात वेगळी स्थिती निर्माण होऊ शकते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी येथे केले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची आज (रविवारी) प्रदेश कार्यालयात बैठक झाली. त्यापूर्वी मलिक यांनी माध्यमांना याबाबत प्रतिक्रिया दिली. या बैठकीत पराभूत उमेदवारांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या संभाव्य भेटीकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागले आहे. मात्र, 'आमच्या महाआघाडीकडे बहुमत असते तर आम्ही केव्हाच सरकार स्थापन केले असते. जनमताचा कौल पाहता आम्ही विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतली आहे. आमच्याकडे सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांच्या संख्याबळाचा जादुई आकडा नाही', अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. 'शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.