मुंबई -टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. मुंबईतील भांडुप येथील ओंकार नलावडे या कलाकाराने 15 ऑगस्टचे औचित्य साधत आपल्या कलेतून ऑलिम्पिक पदक विजेत्यांना अनोखा सलाम केला आहे. सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, रौप्यपदक विजेती मीराबाई चानू, कास्य पदक विजेते बजरंग पुनिया आणि पी. व्ही. सिंधू यांचे अनोखे पोट्रेट त्याने साकारलं आहे.
यंदाचा स्वातंत्र्य दिन हा देशासाठी विशेष आहे. कारण यंदा भारताने टोकियो ऑलम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना भांडुप मधील ओंकार नलावडे या कलाकाराने स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने आपल्या कलेतून अनोखी मानवंदना दिली आहे. ओंकारने कागदी पुठ्याचे रॉड बनवून त्यात इलुस्ट्रीएशन पद्धतीने चार खेळाडू रेखाटले आहेत. एका बाजूने आपल्याला यात नीरज चोप्रा दिसतो तर दुसऱ्या बाजूने पी व्ही सिंधू तर मागे एका बाजूने बजरंग पुनिया दिसतो तर दुसऱ्या बाजूने मीराबाई चानू दिसतात. हे सगळं एकाच पोट्रेटमध्ये साकारण्याची अनोखी किमया ओंकारने साधली आहे.