मुंबई - टाटा वीज कंपनीची कळवा येथील ग्रीड बंद पडल्याने आज मुंबईसह अनेक विभागातील वीजपुरवठा बंद झाला. या दरम्यान मुंबईमधील रुग्णालयांमध्ये रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून वीजपुरवठा खंडित होऊ देऊ नका. वीजपुरवठ्यासाठी तात्काळ जनरेटरची सोय करा तसेच उपलब्ध जनरेटरला डिझेल पुरवा, असे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबईमध्ये बेस्ट, अडाणी, एमएसईबी या वीज कंपन्यांकडून वीजपुरवठा करण्यात येतो. या कंपन्यांना टाटा वीज कंपनीकडून वीज दिली जाते. टाटा कंपनीची कळवा येथील ग्रीड बंद पडली आहे. यामुळे मुंबईसह बाजूच्या जिल्ह्यातील वीज बंद पडली आहे. ग्रीडमधील पुरवठा पूर्ववत होईपर्यंत वीज बंद असल्याने मुंबईतील सर्व व्यवहार बंद पडले आहेत.
मुंबईत वीजपुरवठा बंद असताना रुग्णालयांमध्ये वीजपुरवठा खंडीत होऊ नये म्हणून जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जात आहे. या जनरेटला लागणारा डिझेलचा पुरवठा करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत. वीज बंद राहू नये म्हणून पुरेसे डिझेल रुग्णालयांना पुरवण्याचे आदेशही आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. रुग्णालयातील आयसीयू आणि इतर महत्वाच्या विभागातील वीज बंद होऊन रुग्णांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. तसेच कोविड सेंटरमध्ये विजेचा पुरेसा बॅकअप असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.