मुंबई - कोरोनाबाधितांवर उपचार करताना मलाही कोरोनाची लागण झाली. एकवेळ असं वाटत होतं, की मी आता वाचणार नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पत्नीला शेजारच्या बेडवर पाहिलं आणि आपल्याला कोरोनामधून बाहेर पडायचं आहे, हे ठरवलं. आज मी अगदी ठणठणीत बरा झालो आहे, असे मुंबईतील ६२ वर्षीय डॉक्टर जलिल पारकर यांनी सांगितले.
जलिल पारकर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून तर अभिनेता दिलीप कुमार यांच्यासारख्या अनेक दिग्गजांवर उपचार केले. कोरोना काळात देखील ते लिलावती रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत. जवळपास २०० रुग्णांना तपासल्यानंतर त्यांना अचानक कंबरेमध्ये दुखायला लागले. तसेच प्रचंड थकवा जाणवत होता. मात्र, ताप नव्हता, श्वास घ्यायला त्रास देखील होत नव्हता. तरीही हा कोरोना असावा, असं त्यांना वाटलं. एकवेळ तर ही शेवटची रात्र असल्याचे त्यांना वाटले. मात्र, त्याचवेळी रुग्णालय प्रशासनाने अॅम्बुलन्स घरी पाठवली आणि त्यांना थेट अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यावेळी त्यांची शुद्ध देखील हरपली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी हळू-हळू शुद्ध आली, तर शेजारच्या बेडवर त्यांच्या पत्नीला देखील दाखल केले होते. त्यांनी पत्नीकडे पाहिले आणि आपला मृत्यू झाला, तर पत्नीला कोण सांभाळणार? असा प्रश्न मनात आला. त्याचवेळी ठरवले की, काहीही झाले तरी आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे.