मुंबई Mumbai Crime :प्रभादेवी परिसरात एका चहावाल्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात 4 डिसेंबर रोजी भारतीय दंड संविधान कलम 306, 34, 406, 420, 467 अन्वये गुन्हा दाखल केला. यामध्ये आरोपी रघुवेंद्र पुजारी, पियुष शहा, सहदेव कर्मकर, मारूफ इनामदार, हेमंत सावंत आणि उर्विल शहा यांची नावे आहेत.
काय आहे प्रकरण : तेजस म्हात्रे (चहावाला) प्रभादेवी परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होता. तसंच त्याची बहीण ज्योत्स्ना ओटकर ही शेजारीच राहते. या प्रकरणी ज्योत्स्नानं नोंदवलेल्या तक्रारीत म्हंटलंय की, 2009 पासून तेजस म्हात्रेची आई किडनीच्या आजारानं त्रस्त होती. पण मागील दोन वर्षांपासून त्यांची प्रकृती अजूनच खालावली. त्यामुळं आईच्या उपचारासाठी तेजसनं आपल्या मित्राकडून सहा ते सात लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतर हळूहळू कर्ज वाढतंच गेलं. हे पैसे परत करण्यासाठी तेजसनं आपल्या घराला तारण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यानं रघुवेंद्र पुजारी, पियुष शहा, उर्विल शहा यांच्याकडं विचारणा केली. यावेळी तिघांनीही 25 लाख रुपयांचं कर्ज घेऊन देऊ असं आश्वासन तेजसला दिलं.
कर्जाच्या हप्त्यामुळे त्रस्त होऊन आत्महत्या- काही दिवसांनंतर रघुवेंद्र पुजारी आणि पियुष शहा हे दोघंही तेजसच्या घराचे कागदपत्र घेण्यासाठी त्याच्या घरी गेले. यावेळी त्यांनी सर्व महत्वाच्या कागदपत्रांवर तेजस अन् त्याचा भाऊ तुषार म्हात्रे यांच्या स्वाक्षऱ्या करुन घेतल्या. त्यानंतर आरोपींनी तेजसच्या घरावर 73 लाख रुपयांचं कर्ज काढलं. त्यामधील 36 लाख 50 हजार रुपये त्यांनी मारूफ इनामदार आणि सहदेव कर्मकर यांना दिले. त्यानंतर त्यांनी हे कर्ज फेडण्यासाठी तेजसला धमकावलं. तेजसनं साठ हजार रुपयांचे तीन हप्ते जमा केले. मात्र, नंतर त्याच्याकडं पैसे नसल्यानं तो अजून पैसे भरू शकला नाही. 10 जून 2023 रोजी तेजसच्या घरी बँकेचे कर्मचारी आले. त्यांनी कर्जाच्या हप्त्याबाबत विचारणा केली. ते गेल्यानंतर घरी कोणीच नसल्याचं पाहून तेजसनं आत्महत्या केली.
गुन्हा दाखल :दादर पोलीस ठाण्यात 11 जूनला अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र सहा महिन्यांच्या तपासाअंती पियुष शहा, उर्विल शहा, मारूफ इनामदार, रघुवेंद्र पुजारी, सहदेव कर्मकर आणि हेमंत सावंत यांनी विश्वासघात करून फसवणूक केल्याचं उघड झालं. त्यानंतर 4 डिसेंबर रोजी भारतीय दंड संविधान कलम 306, 34, 406, 420, 467 अन्वये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेही वाचा -
- Mumbai Crime : पीएफ अकाउंटमध्ये 11 कोटी रुपये जमा झाल्याची मारली थाप, 71 वर्षीय वृद्धेला चार कोटींचा गंडा
- Financial Fraud In Mumbai : टेलिग्राम टास्कच्या आमिषापोटी इंजिनिअर अडकला, ४ लाखांना सायबर भुरट्यांनी घातला गंडा
- पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून भोंदू बाबानं पळविले १८ लाख रुपये, पाहा कसा घातला तरुणाला गंडा